Monday, June 5, 2023

वनामकृवित जागतिक पर्यावरण दिन साजरा

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहात आयोजन करण्‍यात आले होते. व्यासपीठावर परभणी विभागीय वन अधिकारी श्री. अरविंद जोशी, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, रेंज वन अधिकारी ऋषिकेश चव्हाण, रेंज वन अधिकारी प्रकाश शिंदे, नांदेड केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगूरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधीत करतांना म्‍हणाले की, पर्यावरणाच्या निरंतर संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रत्येक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून पाळला पाहिजे. येणा-या हंगामात परभणी कृषि विद्यापीठ परिसरातील रेल्‍वे लाईन भोवताल मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणार असुन संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठ प्रक्षेत्रावर वृक्ष लावगड मोहिम राबविण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ. गोखले म्‍हणाले की, झपाट्याने होत असलेल्या हवामान बदलामुळे कृषी उत्पादनावर विपरित परिणाम होत असून कृषी संशोधनाच्‍या आधारे बदलत्‍या हवामानात अनुकूल पिकांचे वाण व कृषि तंत्रज्ञान विकसित करण्‍यात कृषी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. अमर्याद प्लास्टिकच्या वापरामुळे मानवाबरोबर इतर घटकांवरही परिणाम होत असून प्लास्टिकच्या वापरावर व उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज आहे. परभणी कृषी विद्यापीठात वेळोवेळी वृक्ष लागवड, स्‍वच्‍छता मोहिम, पर्यावरणाबाबत प्रबोधन कार्यक्रम राबविण्‍यात येतात.

विभागिय वन अधिकारी अरविंद जोशी यांनी वन विभागाच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून, वन विभागाच्या वतीने पुरेशा प्रमाणात मोफत रोपांचा पुरवठा केला जाईल असे सांगितले.तर प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनी प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे निसर्गाची मोठी हानी होत असून प्रत्येकांनी प्लास्टिकचा वापर करने टाळल्यास पर्यावरणाची जोपासना होण्यास मदत होईल असे सांगितले.

प्रास्‍ताविकात क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या कार्याची माहिती देऊन मिशन लाईफ आणि प्लास्टिक वापरापासून होणा-या गंभीर परिणामाची माहिती दिली. निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा अवलंब करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रणचित चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. रवि शिंदे यांनी मानले.

जागतिक पर्यावरण दिनाच्‍या पुर्वसंध्‍येला कुलगुरु मा डॉ. इन्‍द्र मणि यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरात वृक्ष लागवडीस प्रारंभ करण्यात आला. तसेच विद्यार्थ्‍यांकरिता तृणधान्य व पर्यावरण या विषयावर पोस्‍टर आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्‍यात आले, यात २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच राष्‍टीय सेवा योजना आणि राष्‍ट्रीय छात्रसेनाच्‍या स्‍वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात स्वच्छता मोहिम राबवली तर केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड द्वारे पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोस्‍टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.