Saturday, July 1, 2023

वनामकृवि आणि महिको यांच्‍यात सामंजस्‍य करार

जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महिको प्रा लि यांच्‍या दिनांक २६ जुन रोजी सामंजस्‍य करार संपन्‍न झाला. करारावर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व महिकोचे अध्‍यक्ष श्री राजेंद्र बारवाले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत स्‍वाक्षरी करण्‍यात आली, यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्रीमती जयश्री इन्‍द्रमणि मिश्रा, डॉ चंद्रशेखर चापोरकर, डॉ भारत चार, डॉ खिचर बेग, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ मदन पेंडके, डॉ माधवी, श्री सोमेंद्र मिश्रा आदीची उपस्थिती होती. सामंजस्‍य कराराच्‍या माध्‍यमातुन पिकांचे विविध वाण, भाजीपाला, फळपिके व इतर कृषि संशोधनाकरिता एकत्रितरित्‍या कार्य करण्‍यात येणार आहे. विशेषत: तुर, सुर्यफुल, कापुस, बाजरी, आंबा, मोंसबी आदी मध्‍ये सहकायाने संशोधन करण्‍यात येणार असुन प्रशिक्षण व प्रात्‍यक्षिकेही घेण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठास शंभर वर्षाचा इतिहास आहे. कृषि विकासाकरिता शासन, कृषि विद्यापीठ आणि कृषि उद्योग यांनी एकत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. कृषि उद्योगास लागणारे मनुष्‍यबळ कृषि विद्यापीठात निर्माण होते, त्‍यामुळे कृषि उद्योग क्षेत्रास कशा प्रकारच्‍या कुशल मनुष्‍यबळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थीदशेतच त्‍यांना प्रशिक्षत करता येईल, त्‍या दृष्‍टीने हा सामंजस्‍य करार महत्‍वाचा आहे. फळबाग पिकांत संशोधनास सुरूवात करण्‍यात येईल. 

महिकोचे अध्‍यक्ष श्री राजेंद्र बारवाले म्‍हणाले की, महीको कंपनीने राज्‍यातील माजी मुख्‍यमंत्री स्‍व. वसंतरावजी नाईक यांच्‍या काळात दुष्‍काळ परिस्थितीत संकरीत ज्‍वारीच्‍या वाणाचे बीजोत्‍पादन करून ज्‍वारीच्‍या उत्‍पादन वाढीत आपले योगदान दिले आहे. परभणी कृषि विद्यापीठ कृषि उद्योजकांना सोबत घेऊन कार्य करित आहे, ही एक चांगली बाब असुन शेतकरी बांधवाच्‍या शेतीचे उत्‍पादन वाढीकरिता एकत्रित कार्य करू.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, जनुकीय परावर्तीत पिकांचे वाणांचे प्रयोग महीको कंपनीच्‍या माध्‍यमातुन घेतले असुन परभणी कृषी विद्यापीठ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता पुढाकार घेतला आहे.

डॉ भारत चार म्‍हणाले की, आज तंत्रज्ञानाचे युग असुन कृषि उद्योगास ज्‍या कुशल मनुष्‍यबळाची गरज आहे, ती कौशल्‍य कृषि पदवीधरांना आत्‍मसाद करण्‍याकरिता हा सामंजस्‍य करार उपयुक्‍त ठरेल. बैठकीचे प्रास्‍ताविक डॉ चंद्रशेखर चापोरकर यांनी केले.