Saturday, July 8, 2023

विद्यापीठ विकसित वाणाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍यादृष्‍टीने १२५० एकर प्रक्षेत्रावर पेरणीस सुरूवात

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान विविध पिकांच्‍या वाणांचे पायाभुत, पैदासकार, प्रमाणित आणि सत्‍यतादर्शक बीजोत्‍पादन घेतले जात होते. हे दर्जेदार बियाणे शेतक-यांना माफक दरात उपलब्‍ध करून देण्‍यात येत. परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या.

यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. सदर प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू यांनी प्रक्षेत्रास वेळोवेळी भेट देऊन यातुन जास्‍तीत जास्‍त क्षेत्र बीजोत्‍पादनाखाली आणण्‍याकरिता करावयाच्‍या उपाय योजनांवर विचारमंथन करण्‍यात आले. या वर्षी उन्‍हाळयात १२५० पडिक जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स व आवश्‍यक औजारे तसेच जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. सद्यस्थितीत जवळपास १२५० एकर जमिन क्षेत्र या खरीप हंगामात पैदासकार बीजोत्‍पादनाकरिता तयार झाले आहे. यावर्षी विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहे, या माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होणार आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे.

दिनांक ६ जुलै रोजी मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावर नवीन लागवडीकरिता तयार करण्‍यात आलेल्‍या प्रक्षेत्रावर बीजोत्‍पादन कार्यक्रमातंर्गत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पेरणीचे उदघाटन करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित विविध वाणांच्‍या बियाणास शेतकरी बांधवांची मोठी मागणी असुन विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याकरिता विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर पैदासकार बीजोत्‍पादन कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. या पैदासकार बियाणे पासुन प्रमाणित व सत्‍यतादर्शन बीजोत्‍पादन मोठया करणे शक्‍य होऊन विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होईल.  

यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी संचालक बियाणे डॉ के एस बेग आदीसह इतर मान्‍यवर उपस्थित होते. या क्षेत्रावर विद्यापीठ विकसित विविध वाणांचे खरीप हंगामात सोयाबीन पिकांच्‍या एमएयुएस-६१२, एमएयुएस-७१, एमएयुएस-७२५ आणि जेएस-२०-११६ तसेच तुर पिकांचा बीडीएन-७११, बीडीएन-१३४१ या वाणांचे पैदासकार बीजोत्‍पादन घेण्‍यात येणार आहे. माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍तीश: लक्ष घालुन आवश्‍यक यंत्रसामुगी उपलब्‍ध करून दिल्‍याने एवढे मोठे प्रक्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकले, अशी माहिती मध्‍यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ विलास खर्गखराटे यांनी दिली. सदर बीजोत्‍पादनाकरिता विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व मजुर वर्गाच्‍या मोठया प्रमाणात परिश्रम घेत आहेत.




उन्‍हाळयात १२५० एकर जमीन लागवडीकरिता तयार करतांना