Sunday, July 2, 2023

मौजे पोखर्णी येथे आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिके अंतर्गत बियाणाचे वाटप व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय समन्वयीत संशोधन कृषीरत महिला प्रकल्प, ज्वार संशोधन केन्द्र आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विघमाने दिनांक २ जुलै रोजी मौजे पोखर्णी येथे भरडधान्य उत्पादन आणि त्यांच्या दैनंदिन आहारातील वापर वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी आधरेषीय पीक प्रात्यक्षिके अंतर्गत ज्वारी आणि बाजरी पिकांच्‍या विद्यापीठ विकसित बियाणाचे वाटप करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पिक लागवडीबाबत मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्री अन्नग्राम कार्यक्रमासाठी अखिल भारतीय समन्वयीत संशोधन कृषीरत महिला प्रकल्पाने पोखर्णी (ता. जि. परभणी) हे गाव दत्तक घेतले आहे.

कार्यक्रमास अभाससंप्र-कृषीरत महिला केंद्र समन्वयक डॉ. सुनीता काळे यांनी भरडधान्याचे महत्त्व, त्यांचे फायदे आणि भरडधान्यावर प्रकीया, त्यावर आधारित अन्नपदार्थ यावर मार्गदर्शन केले. ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ लक्ष्मण जावळे यांनी भरडधान्याचे विविध वाण, ज्वारीच्या सुधारित वाणांची वैशिष्ट्ये आणि उत्पादन क्षमता यावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरडधान्य लागवडीचे तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया आणि खताचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गावातील शेतकरी आणि महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्रकल्पाचे प्रसाद देशमुख आणि ज्वार संशोधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.