Friday, July 28, 2023

वनामकृवित प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी संमेलनाचे थेट प्रक्षेपण

देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते दिनांक २७ जुलै राजस्थानातील सिकर येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संमेलन मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि ग्रामीण महिलांकरिता कार्यशाळेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने तसेच करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, आत्‍माचे तंत्र व्‍यवस्‍थापक श्रीमती स्‍वाती घोडके, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती शितल पौळ, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात नऊ करोड शेतकरी बांधवाच्‍या खात्‍यामध्‍ये किसान सम्‍मान निधि योजनेच्‍या साधारणत: १८ कोटी रूपये जमा करण्‍यात आले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राजस्‍थान येथील सीकर मध्‍ये १.२५ लाख किसान समृध्दि केंद्राची सुरूवात केली. माननीय पंतप्रधान यांनी थेट प्रक्षेपणाव्‍दारे शेतकरी बांधवाना संबोधीत केले.

विद्यापीठात आयोजित थेेट प्रक्षेपण कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता भारत सरकार, राज्‍य सरकार, विविध संस्‍था व कृषि विद्यापीठ कार्य करित आहेत. हवामान मराठवाडयातील शेती पुढे अनेक समस्‍या आहेत. शेतकरी बांधवांतील नैराश्‍य कमी करण्‍याकरिता मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्‍तरावर प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. प्रत्‍येकांच्‍या जीवनात चढउतार येत असतात, माणसाचे आयुष्‍य हे संघर्षमय आहे, संघर्षाचा सामना करणे हेच जीवन आहे. कुटुंबातील अविश्‍वासामुळे मनुष्‍य जास्‍त नैराश्‍यात जातो, त्‍यामुळे कुटुंबातील सर्व व्‍यक्‍तींनी एक विश्‍वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. समाज सुदृढ बनविण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे, यात महिलांची भुमिका महत्‍वाची असुन कौटुंबिक वातावरण सुदृढ बनविण्‍याकरिता त्‍यांनी पुढाकार घ्‍यावा.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री पंडीत थोरात, श्री विलास जावळे, श्री जनार्दन आवरगंड, डॉ डि डि पटाईत आदीसह ६० ग्रामीण महीला व विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.