Monday, October 16, 2023

वनामकृवित एल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे व्‍यवस्‍थापन कार्यशाळेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने कृषि विद्यापीठ, जिल्‍हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक यांच्‍याकरिता दिनांक १८ ऑक्‍टोबर २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या परभणी येथील प्रशासकीय इमारतीतील सिम्‍पोजिम हॉल (हॉल क्रमांक १८) येथे एल-निनोच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि राहणार आहे. या वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे मराठवाडा विभागात झालेल्या अपु-या पावसाच्या पार्श्‍वभुमीवर पुढील हंगामात पिकांचे नियोजन, उपाययोजना आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्‍याच्‍या अनुषंगाने कार्यशाळेत विचारमंथन करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत एल-निनो वर्षाच्‍या पार्श्‍वभुमीवर रबी हंगामाचे नियोजन, मुख्‍य रबी पिकांचे लागवड, किड व रोग व्‍यवस्‍थापन, कार्यक्षम पाणी व्‍यवस्‍थापन, दुष्‍काळ परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठीच्‍या उपाययोजना, कमी पाण्‍यावर येणा-या भाजीपाल्‍याची लागवड, पशुधनाकरिता चारापिकांचे नियोजन, पशुधनाचे लंपीरोग व उष्‍णतेपासुन संरक्षण आदी विषयावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ सादरीकरण करून विचारविनिमय करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेत मराठवाडा विभागातील जिल्‍हा प्रशासन आणि कृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) येथील अधिकारी व कृषी विस्‍तारक, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी आदींनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.