Saturday, October 21, 2023

आंतर महाविद्यालयीन युवक महोत्‍सवात परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचे घवघवीत यश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयात दिनांक १७ आणि १८ ऑक्‍टोबर रोजी पार पडलेल्‍या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२३ मध्ये परभणी कृषि महाविद्यालाच्या संघाने विविध कला प्रकारात घवघवीत यश संपादित केले. पुरस्‍कार प्राप्‍त संघाचे आणि विद्यार्थ्‍यांचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी सत्‍कार करण्‍यात आला. फाईन आर्ट प्रकारात पोस्टर मेकिंग, स्पॉट पेंटिंग, कार्टूनिंग, कोलाज यात एक सुवर्ण पदक, ३ रजत व ३ कास्य पदके पटकावली. लिटररी स्पर्धेत २ सुवर्ण व १ रजत पदक तर शास्त्रीय संगीत, मिमिक्री, एकपात्री या कला प्रकारात सुवर्ण पदक तसेच शास्त्रीय नृत्य, लावणी, स्कीट या प्रकारात कांस्यपदक, अशी प्रकारे एकूण ९ सुवर्ण,४ रजत व ६ कास्य पदके पटकावुन घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले तर उपाध्यक्ष जिमखाना डॉ पी आर झंवर, डॉ एम एम सोनकांबळे, संघ व्यवस्थापक डॉ नरेंद्र कांबळे, डॉ अनुराधा लाड, श्री अमोल सोनकांबळे आदींनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.