Tuesday, November 3, 2026

वनामकृवितील सावित्रीबाई फुले वसतिगृहातील विद्यार्थिनींशी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा संवाद; स्वच्छता अभियानातून आरोग्य व सामाजिक जबाबदारीचा संदेश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृह परिसरात दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या निमित्ताने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील नूतन पदव्युत्तर विद्यार्थिनींशी संवाद साधत स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वतःचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले. समाज समृद्ध, सुसंस्कृत आणि निरोगी घडविण्यामध्ये युवतींची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींच्या भोजन कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. विद्यापीठात प्रवेश घेतल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वनामकृवि हे आज देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठांपैकी एक असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक व सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. संदीप बडगुजर, वसतिगृह अधीक्षिका डॉ. गोदावरी पवार, डॉ. विक्रम घोळवे व डॉ. धीरज पाथ्रीकर उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामध्ये वसतिगृहातील सर्व सहाय्यक कर्मचारी तसेच कुशल व अकुशल कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महत्त्वपूर्ण योगदान दिले. विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेची जाणीव, आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.