फुलोरा व शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत पिकाचे नियमित निरीक्षण करण्याचा सल्ला
यंदा एल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामात मराठवाड्यातील अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तथापि, संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या भागांत तुरीचे पीक चांगल्या अवस्थेत असून काही ठिकाणी कळ्या लागण्यास सुरुवात झाली आहे, तर काही क्षेत्रांत तुरळक फुलोरा दिसून येत आहे. आगामी काळात बहुतांश क्षेत्रावर तुरीचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तुरीवरील शेंग पोखरणारी अळी (हेलिकोवर्पा) व शेंगमाशी या किडींचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे तज्ज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. जी. डी. गडदे व श्री. एम. बी. मांडगे यांनी केले आहे.
सध्या काही भागांत ढगाळ वातावरण असल्याने तुरीच्या पिकाचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक आहे. शेंग पोखरणारी अळी कळ्या, फुले व शेंगांचे नुकसान करते. तर शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत शेंगमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेतच किडींची लक्षणे ओळखून नियंत्रणाचे उपाय योजावेत.
शेंग पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन : अळीच्या नियंत्रणासाठी पूर्ण वाढ झालेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी प्रति एकर दोन कामगंध (फेरोमोन) सापळे लावावेत. पक्ष्यांच्या मदतीने अळ्यांचे नियंत्रण होण्यासाठी प्रति एकर २० इंग्रजी 'टी' आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. तसेच झाडाखाली पोते अंथरून झाडे हलवावीत व खाली पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन घटक असलेल्या जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.
किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपर्यंत पोहोचल्यास इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एसजी (४.४ ग्रॅम), स्पिनोसॅड ४५ टक्के एससी (३ मिली), इंडाक्झाकार्ब १४.५ टक्के एससी (८ मिली), क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी (३ मिली), फ्लुबेंडामाईड २० टक्के डब्ल्यूजी (५ ग्रॅम) किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.६ टक्के झेडसी (४ मिली) यापैकी कोणत्याही एका शिफारस केलेल्या कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात योग्य मात्रा मिसळून फवारणी करावी.
*शेंगमाशीचे व्यवस्थापन : तुरीला शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत पिकाचे नियमित निरीक्षण करावे. शेंगमाशीचा प्रादुर्भाव आढळल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी (८ मिली) किंवा ल्युफेन्युरॉन ५.४ टक्के ईसी (१२ मिली) यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात योग्य मात्रा मिसळून फवारणी करावी.
*फवारणी करताना घ्यावयाची काळजी : एकाच वेळी अनेक कीटकनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये. कीटकनाशकांसोबत बुरशीनाशके, विद्राव्य खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये अनावश्यकपणे मिसळणे टाळावे. एकाच कीटकनाशकाची वारंवार फवारणी न करता गरजेनुसार वेगवेगळ्या कार्यपद्धतीच्या शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. फवारणीपूर्वी उत्पादनाच्या लेबलवरील पिकाचे नाव, लक्ष्य कीड, मात्रा व वापरासंबंधी सूचना तपासाव्यात. फवारणी करताना मास्क, हातमोजे, संरक्षक चष्मा, बूट व अंग झाकणारे कपडे वापरावेत. फवारणीनंतर हात, चेहरा व वापरलेली साधने साबणाने स्वच्छ धुवावीत.
तुरीचे पीक किडींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यकतेनुसार शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा योग्य वापर करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क : कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी. दूरध्वनी : ०२४५२-२२९०००. व्हॉट्सॲप हेल्पलाईन : ८३२९४३२०९७.








