Wednesday, July 1, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषि दिना निमित्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक १ जुलै २०२६ रोजी स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषि दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते तथा कृषि विकासाचे दूरदर्शी नेते स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषि, सिंचन, जलसंधारण, ग्रामीण विकास व शेतकरी कल्याणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १ जुलै रोजी कृषि दिन साजरा केला जातो, असे सांगून कृषि दिनाचे महत्त्व विशद केले. तसेच पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची गरज, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे नियमित संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच ‍ विद्यार्थीनी यांच्या हंस्ते वृक्षालागवड करण्यात आली. लावलेल्या वृक्षाची संगोपन करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना देण्यात आली.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. रघुनाथ जायभाये,  डॉ. पंडित मुंडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. प्रमोदीनी मोरे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, इंजी. शिवणकर, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे तसेच कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी राधेशाम खटींग, सतेज मेटकर, कुनाल गडाख, राम शेडंगे, आभिमन्यु घूगे, गणेश बोराडे, संकेत पवार, मोदीता इंगळे, दुधाटे गीता तसेच, श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड , श्री. जितेंद्र खिल्लारे, श्री. रमेश मोहीते व श्री. माणिक खटींग इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.




सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

 कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दिनांक १ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या कृषी विकासातील योगदानाला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत कृषी क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव केला.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, महाराष्ट्रात हरितक्रांतीची पायाभरणी करून शेती विकासाला नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. शेतकरी केंद्रित धोरणे, सिंचन विकास, कृषी शिक्षण आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे.

कृषिदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देत आंबा, चिकू, करंज, चाफा, जास्वंद यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








वनामकृवित स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात; कृषि विकासासाठी आदर्श घेण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दिवस दिनांक १ जुलै रोजी कृषि दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मारकास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव नाईक हे देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न होते. अत्यंत कठीण काळात त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि सलग ११ वर्षे राज्याचा यशस्वी कारभार पाहिला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी देशात लोकसंख्या कमी असतानाही अन्नधान्याची मोठी टंचाई होती. मात्र त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि ती यशस्वीपणे राबविण्यात आली.

त्यामुळे आज देशाची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा अधिक असूनही भारत सुमारे ३७६ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करत आहे. एवढेच नव्हे तर देशातील सुमारे ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करून भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला असून अनेक देशांना अन्नधान्याची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी भारताचे माननीय पंतप्रधान यांनीदेखील भारत संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवठा करू शकतो, असे नमूद केले होते. हे यश हरितक्रांतीमुळेच शक्य झाले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जागतिक पातळीवर भारतामध्ये आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही, अशी चर्चा होत होती. मात्र अशा कठीण परिस्थितीत स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हे आव्हान समर्थपणे पेलत हरितक्रांतीच्या माध्यमातून देशाच्या शेती विकासाला नवी दिशा दिली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य देशाच्या कृषि विकासामध्ये दिशादर्शक कार्य करत आहे. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री शरदचंद्र पवार यांच्या कृषि विकासातील योगदानाचाही विशेष उल्लेख केला. भारतीय शेती महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात ज्ञान आत्मसात करत आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेऊन शेती विकासासाठी चांगले कार्य केले पाहिजे. याबरोबरच विद्यापीठही सातत्याने प्रगती करत असून या यशामध्ये सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, सहाय्यक नियंत्रक श्री. अनंत कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि रावे उपक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. फरिया खान यांनी विशेष परिश्रम घेतले.












पाणीच नवी कृषीक्रांती घडवू शकते; जलसंधारण आणि संवर्धित सिंचनावर भर आवश्यक” : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित सिंचन जल व्यवस्थापनावरील राष्ट्रीय द्विवार्षिक कार्यशाळेचे उद्घाटन

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाचे (ICAR-NRM) उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – सिंचन जल व्यवस्थापन विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थान (IIWM – Indian Institute of Water Management) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ ते ३ जुलै २०२६ दरम्यान आयोजित सिंचन जल व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ चे उद्घाटन दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉल येथे झाले.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाचे (ICAR-NRM) उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक यांनी आभासी माद्यामाद्वारे सहभाग नोंदविला. व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ. ए. सारंगी, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जल व्यवस्थापन) चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव,  माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गुप्ता, डॉ. डी. के. शर्मा, डॉ. के. एन. तिवारी, डॉ. एस. डी. गोरंटीवार, जैन इरिगेशनचे श्री. बी. डी. जडे आदी मान्यवर यांच्यासह भारतातील विविध राज्यांमधील २६ संशोधन केंद्रांतील ४३ शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली, तर २२ शास्त्रज्ञांनी आभासी माध्यमाद्वारे सहभाग नोंदविला. तसेच विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांचाही या कार्यक्रमात सहभाग होता.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या कार्यशाळेत देशभरातील शास्त्रज्ञ सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी जल बिना जीवन नहीं” असे नमूद करत, मानवी जीवन, स्वच्छता आणि संपूर्ण समाजव्यवस्थेसाठी पाणी किती अनिवार्य आहे हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, जसे शेतीसाठी ज्ञान आवश्यक आहे, तसेच पाण्याचेही अत्यंत महत्त्व असून या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जलतज्ज्ञांमध्ये विचारमंथन होऊन सिंचनातील पाणी बचतीसाठी उपयुक्त शिफारशी पुढे येतील.

विद्यापीठामध्ये सन १९८० पासून कार्यरत असलेल्या सिंचन जल व्यवस्थापन योजनेद्वारे अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, त्या तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये प्रभावी प्रसार करण्यात आला आहे. तसेच एससीएसपी (SCSP) आणि टीएसपी (TSP) कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील १२ गावांमध्ये पथदर्शी कार्यक्रम राबवून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी शेतकरी देवो भवः” हा नारा दिला होता आणि त्याच भावनेतून सातत्याने कार्य सुरू आहे. आजच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात देखील शेतकऱ्यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या अनुभव, विचार आणि सल्ल्यांची नोंद या कार्यशाळेच्या चर्चेत व्हावी, असे आवाहन त्यांनी केले.

जलसिंचन संशोधनासह विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र शासन सातत्याने प्रोत्साहन व अनुदान उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.  पुढे ते म्हणाले की, पाण्याच्या बचतीसाठी पाण्याचा संचय, संवर्धन आणि न्यायिक वापर (Collect, Conserve and Judicial Use of Water) अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच दृष्टीने विद्यापीठाने ९ कोटी लिटर क्षमतेचे अमृत सरोवर (शेततळे) निर्माण केले असून, भविष्यात २६ कोटी लिटर जलसंचयाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून अनेकदा दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. यासाठी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असले तरी अजून अनेक बाबींवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने त्रिशूल तंत्रज्ञान” विकसित केले असून, त्यामध्ये शेततळे, सूक्ष्म सिंचन आणि सौरऊर्जेचा वापर यांचा समावेश आहे. याद्वारे विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर तसेच बदनापूर येथील प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकांद्वारे पाण्याचे महत्त्व प्रभावीपणे दाखवून देण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला संबंधित राज्य शासनाची मान्यता मिळणे आवश्यक असते. त्यानंतरच त्या तंत्रज्ञानाचा शासनाच्या योजनांमध्ये समावेश होऊ शकतो, हे शेततळ्याच्या उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केवळ कृषि अभियंत्यांचे कार्य महत्त्वाचे नसून बीज पैदास तज्ज्ञांसह सर्व संबंधित शाखांचे योगदान तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या गोदावरी तूर वाणाच्या विकासाद्वारे विद्यापीठाने हे सिद्ध करून दाखवले आहे.

देशातील जवळपास ८० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. हा वापर कमी करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आणि आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उत्पादन वाढीसाठी तसेच सिंचन क्षेत्र विस्तारासाठी सातत्याने संवर्धित सिंचनाचा आग्रह धरत आहेत.

देशाने ५० मिलियन टनांवरून ३७६ मिलियन टन कृषी उत्पादनापर्यंत मोठी झेप घेतली असून, यात संवर्धित सिंचनाचा व्यापक वापर झाल्यास उत्पादनात आणखी मोठी वाढ निश्चित होईल. महाराष्ट्रातून संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरणारे शेती तंत्रज्ञान दिले जात असून, या कार्यशाळेतून भविष्यासाठी उपयुक्त आणि परिणामकारक शिफारशी पुढे याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यासोबतच शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र आणि शासन म्हणजेच Academia – Industry – Government या त्रिस्तरीय समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पाणीच नवी क्रांती घडवू शकते” असे नमूद करत, कोणतेही तंत्रज्ञान विकसित करताना त्याद्वारे पाण्याची बचत कशी साधता येईल याचा विचार प्रत्येक शास्त्रज्ञाने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक म्हणाले की, सिंचन जल व्यवस्थापनासाठी पाण्याचा काटेकोर व कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने स्पष्ट ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करून योग्य कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. याच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांतील संभाव्य परिणाम आणि मिळणारे लाभ यासंदर्भातील योग्य दस्तऐवज तयार करण्यात यावेत, ज्याचा उपयोग प्रभावी नियोजनासाठी करता येईल.

त्यांनी सांगितले की, केवळ मागील पाच वर्षांतील नव्हे तर प्रकल्प सुरू झाल्यापासून झालेल्या सर्व महत्त्वपूर्ण यशस्वी कामगिरीची नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच भारतातील सर्व केंद्रांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात यावे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांना प्रोत्साहन देण्यात यावे.

याबरोबरच विकसित तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे प्रात्यक्षिकरण करावे. या कार्यशाळेतील चर्चेमधून योग्य नियोजन आणि प्रभावी शिफारसी समोर याव्यात. तसेच जिल्हास्तरावर जलसिंचन नियोजनासाठी सखोल चर्चा व्हावी. जलआधारित आर्थिक नियोजन आणि पीक नियोजनाला प्राधान्य देण्यात यावे. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील उपलब्ध पाण्याचा विचार करून पीक नियोजन निश्चित करावे आणि पुढील पाच वर्षांसाठी सक्षम व परिणामकारक असा आराखडा तयार करावा, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची आज नितांत गरज आहे. हवामान बदल ही जागतिक पातळीवरील गंभीर बाब असून त्यासोबत अनेक समस्या जोडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. तसेच सिंचनाच्या पायाभूत सुविधा वाढवून पाण्याचा काटेकोर व कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. पाण्याचे घरगुती, औद्योगिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये बहुविध उपयोग होत असून त्याचा वापर करणारे अनेक घटक (Stakeholders) आहेत. पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्धतेवरील ताण या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी अथवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी या कार्यशाळेत सखोल चर्चा व्हावी, असे त्यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध संशोधन कार्यांचा आढावा सादर केला.

भुवनेश्वर येथील संचालक डॉ. ए. सारंगी यांनी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या भुवनेश्वर येथील मुख्य कार्यालयासह देशातील २६ केंद्रांवर सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याची माहिती दिली.

उद्घाटन समारंभादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर तसेच शेतकरी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल तसेच देशातील विविध ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी लिखित विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. हरीश आवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन उप संचालक संशोधन डॉ. सुनिता पवार यांनी केले.

कार्यशाळेत देशभरातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांतर्गत सिंचन जल व्यवस्थापन केंद्रांतील शास्त्रज्ञ सिंचन जल व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरील जल नियोजन तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील सिंचन जल व्यवस्थापनचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी सर्व संबंधितांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.




नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा व जल व्यवस्थापन विभागाचे 
सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन

भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे 
संचालक डॉ. ए. सारंगी
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग







सिंचन जल व्यवस्थापनचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी

उप संचालक संशोधन डॉ.
 सुनिता पवार 

माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात वृक्षारोपण

 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते व कृषी विकासाला नवी दिशा देणारे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२६ रोजी  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यापीठ परिसरात विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासाच्या दूरदृष्टीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षलागवड हीच भावी पिढ्यांसाठी खरी गुंतवणूक असल्याचा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी केले.

यावेळी डॉ. अंशुल लोहकरे, डॉ. अमोल भोसले, डॉ. राहुल बघेले, डॉ. सय्यद शबनम, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. आशा सातपुते, डॉ. अर्चना घनवट, डॉ. कल्याणी देशमुख, डॉ. महेश, श्री. भुसारी तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प व्यक्त केला.