Friday, September 25, 2026

वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची आयसीएआर-सीआयआरसीओटीच्या व्यवस्थापन समितीवर नियुक्ती

 तीन वर्षांसाठी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून नामनिर्देशन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांची भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (आयसीएआर-सीआयआरसीओटी ICAR-CIRCOT) संस्थात्मक व्यवस्थापन समितीवर (Institute Management Committee–IMC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आयसीएआर-सीआयआरसीओटीचे संचालक डॉ. एस. के. शुक्ला यांनी दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या सुधारित कार्यालयीन आदेश क्रमांक १६७ नुसार डॉ. आसेवार यांचे तीन वर्षांच्या कालावधीसाठी नामनिर्देशन करण्यात आले आहे. त्यांची नियुक्ती दिनांक १० सप्टेंबर २०२६ पासून आमलात आली आहे.

आयसीएआर सोसायटीच्या नियम व उपनियमांमधील नियम ६६(अ)(२) नुसार, संस्थेतील संशोधनाशी संबंधित राज्य शासनाच्या कृषि, उद्यानविद्या, पशुसंवर्धन किंवा मत्स्यविज्ञान विभागाच्या संचालकांना संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर पदसिद्ध सदस्य म्हणून स्थान देण्यात येते. या तरतुदीनुसार डॉ. आसेवार यांची समितीवर नियुक्ती झाली आहे.

या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता व विभागप्रमुख यांनी डॉ. भगवान आसेवार यांचे अभिनंदन केले.

डॉ. भगवान आसेवार हे कृषि संशोधन क्षेत्रातील अनुभवी शास्त्रज्ञ असून त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून देखील सन्मानित केले आहे. ते सध्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत. कापूस संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि संशोधनविषयक धोरणात्मक बाबींमधील त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या कार्यात होणार आहे. या माध्यमातून कापूस संशोधन व तंत्रज्ञान विकासाला राष्ट्रीय स्तरावर दिशा देण्यास त्यांना योगदान देता येणार आहे.

या नियुक्तीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि संशोधन कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले असून, मराठवाड्यातील कृषि संशोधनाच्या कार्यालाही यामुळे बळकटी मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.