Friday, August 21, 2026

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेच्या एमबीए विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्लेसमेंट; २२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था (Post Graduate Institute of Agribusiness Management – PGIABM), चाकूर येथील एमबीए (अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट) २०२४–२६ या बॅचच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण ३५ विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वी निवड झाली असून, प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांमध्ये ६२.८६ टक्के प्लेसमेंटचे उत्कृष्ट प्रमाण नोंदविण्यात आले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ५ ते ७ लाखांपर्यंतचे वेतन पॅकेज, तसेच अतिरिक्त प्रोत्साहन व विविध लाभ मिळणार आहेत. कृषी, बँकिंग, कृषी-निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय उत्पादने, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रांतील नामांकित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची नुकतीच निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या उत्तम कामगिरीचे कौतुक करून भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेतील इतर विद्यार्थ्यांनीही अशाच प्रकारे उल्लेखनीय यश संपादन करावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांची निवड झालेल्या प्रमुख संस्थांमध्ये आयसीआयसीआय बँक (१), आयडीएफसी फर्स्ट बँक (२), कृषीवन टेक्नॉलॉजीज प्रा. लि., हैदराबाद (२), यूपीएल लि. (२), हिंदुस्थान फीड्स (३), स्वाल कॉर्पोरेशन लि. (२), लिगर शिपिंग प्रा. लि. (१), हायफिल्ड ऑर्गॅनिक्स इंक. (३), विल्सन ॲग्री सायन्स (१), कोरोमंडल इंटरनॅशनल लि. (१), ॲग्रो ब्राइट फार्म सोल्युशन प्रा. लि., पुणे (१), उमंग अँड असोसिएट्स, इंदूर (१) आणि सिंजेंटा प्रा. लि. (२) यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, उर्वरित १३ विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. हे विद्यार्थी प्रामुख्याने शासकीय सेवा व सार्वजनिक क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असून, विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

या यशाबद्दल बोलताना पीजीआयएबीएम, चाकूरचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले की, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले असून, त्याचीच ही पावती आहे. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव, करिअर-केंद्रित उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांची मेहनत व समर्पण यामुळे हे उल्लेखनीय यश साध्य झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य लाभल्याबद्दल डॉ. संतोष कांबळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

पीजीआयएबीएम, चाकूरच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण करिअर विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.





वनामकृवित माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते सुधारित तुती लागवड उपक्रमाचा शुभारंभ; रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यासाठी संशोधनावर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील रेशीम संशोधन योजनेअंतर्गत सुधारित तुती लागवड उपक्रमास दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते तुतीची रोपे लावून सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचा लाभ राज्यातील सर्व रेशीम उद्योजकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. विद्यापीठामध्ये रेशीम उद्योगाशी संबंधित संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि प्रात्यक्षिकांना प्राधान्य देण्यात येत असून, संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील रावे (Rural Agricultural Work Experience) घटक संलग्नता उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेस संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता कृषि क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करून कृषि व रेशीम उद्योगामध्ये उद्योजक म्हणून पुढे यावे, असा सल्ला माननीय कुलगुरूंनी दिला.

रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. धीरजकुमार कदम यांनी सुधारित तुती लागवड उपक्रमाचे महत्त्व विशद केले. रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, तुतीची उत्पादकता, पानांची गुणवत्ता तसेच लागवडीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च यांचा विचार करून योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत रेशीम संशोधन योजनेच्या प्रक्षेत्रावर विविध अंतरावर तुतीची वृक्ष व झुडूप पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. या प्रक्षेत्रावर विविध लागवड पद्धतींचे संशोधन व प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून, त्यातून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर तुती लागवड पद्धतीची शिफारस करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशीम उद्योजकांना तुतीची उत्पादकता वाढविण्यास तसेच रेशीम उद्योग अधिक फायदेशीर करण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. के. टी. जाधव, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, डॉ. कुलदीप शर्मा, डॉ. अविनाश राठोड, डॉ. अर्चना घनवट, शास्त्रज्ञ श्री. धनंजय मोहोड, डॉ. संजोग बोकन, श्री. ऋषिकेश औंढेकर आणि श्री. दत्ता जटाळे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू गंभीरे, अनंत गाडेकर, रोहित मोरे, राधिका चव्हाण, प्रवीण वडकुते, विश्वनाथ काकडे आणि विठ्ठल मोहिते यांनी परिश्रम घेतले.






Thursday, August 20, 2026

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वनामकृवित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सद्भावना संकल्प

 

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सद्भावना दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सद्भावना शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले.

विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉलमध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले. उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, शांतता, सद्भावना आणि सामाजिक ऐक्याची भावना दृढ करण्याची शपथ घेतली. विविधतेने नटलेल्या भारताच्या एकात्मतेसाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये परस्पर स्नेह, बंधुभाव व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याचा संकल्प करण्यात आला.

विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून राष्ट्रीय सद्भावना दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.



Wednesday, August 19, 2026

वनामकृविच्या कृषी महाविद्यालयात ‘सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ विषयावर कार्यशाळा संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विविध वसतिगृहांतील विद्यार्थिनींसाठी सशक्त युवती : उद्याच्या समृद्ध राष्ट्राची शिल्पकार’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन दि. १८ व १९ ऑगस्ट २०२६ रोजी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहांमध्ये करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी, जि. अहिल्यानगर येथील वेलनेस इन्स्ट्रक्टर श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सशक्त युवती घडविण्यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, आत्मनिर्भरता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. शिक्षण, कौशल्यविकास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्रीमती वैशाली आहिरे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आहार, विहार, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती, योग, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व विशद केले. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योगाभ्यास यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते, असे त्यांनी सांगितले. युवतींनी शिक्षणासोबतच स्वावलंबन, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करून राष्ट्राच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींसाठी विविध योग, प्राणायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्यविषयक प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांसाठी डॉ. सचिन पाठक व श्रीमती सोनी पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध योग व आरोग्यविषयक उपक्रमांचा लाभ घेतला.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. रावसाहेब भाग्यवंत, वसतिगृह अधीक्षक डॉ. गोदावरी पवार तसेच सहाय्यक वसतिगृह अधीक्षक श्रीमती सुनीता भुरके व श्रीमती अंजली इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यशाळेस कृषि महाविद्यालयातील विविध मुलींच्या वसतिगृहांतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरोग्यदायी जीवनशैली, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांच्या माध्यमातून सक्षम युवती घडविणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सशक्त युवती हीच सक्षम समाज आणि समृद्ध राष्ट्राची आधारशिला आहे’ या संदेशाने कार्यशाळेची सांगता झाली.








‘माझे घर, माझी बाग’ उपक्रमातून महिलांना परसबाग व घरगुती बागेचे प्रशिक्षण

 वनामकृवितील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्राचा उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प – कृषिरत महिला केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय आणि लोकमत समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माझे घर, माझी बाग’ या उपक्रमाचे आयोजन दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले.

हा उपक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संचालक संशोधन डॉ. भगवान असेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कृषिरत महिला केंद्राचा घटक समन्वयिका तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, कार्यक्रमाचे समन्वयक तथा सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. शंकर पुरी, मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, लोकमत समूहाच्या समन्वयिका राधिका जोगळेकर तसेच सखी मंचच्या लता साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात लोकमत सखी मंचाच्या सदस्यांना उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाने विकसित केलेल्या भेंडी व टोमॅटोच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, लोकमत समूहातर्फे आयोजित ‘माझे घर, माझी बाग’ या स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त सखींचा मान्यवरांच्या हस्ते लोकमत समूहातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी बियाण्यांची निवड, लागवड तंत्रज्ञान तसेच कमी जागेत अधिक भाजीपाला उत्पादन घेण्याच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. डॉ. नीता गायकवाड यांनी संतुलित आहारातील भाजीपाल्याचे महत्त्व स्पष्ट करून कुटुंबाच्या आरोग्य व पोषणासाठी घरगुती भाजीपाला उत्पादनाची गरज अधोरेखित केली.

डॉ. पपीता गौरखेडे यांनी मातीचे आरोग्य जपण्यासाठी सेंद्रिय घटक, कंपोस्ट व सेंद्रिय खतांचे महत्त्व सांगून घरगुती बागेसाठी सुपीक व आरोग्यदायी माती तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले.

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रोपवाटीकेत डॉ. बी. एम. कलालवंडी यांनी भाजीपाला उत्पादनाच्या विविध पद्धतींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी घराच्या उपलब्ध जागेनुसार वाफे, कुंड्या, कंटेनर तसेच इतर माध्यमांचा वापर करून भाजीपाला लागवड कशी करता येते, याबाबत माहिती दिली.

माझे घर, माझी बाग’ या संकल्पनेतून महिलांनी घराच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून पौष्टिक, सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने भाजीपाला तसेच औषधी वनस्पतींची लागवड करावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षणादरम्यान घरगुती बागेचे नियोजन, सेंद्रिय खत व कंपोस्ट तयार करणे, भाजीपाला व फुलझाडांची लागवड, किचन गार्डन व औषधी वनस्पतींची लागवड, पाणी व्यवस्थापन, तण व कीड नियंत्रण, नियमित देखभाल तसेच उपलब्ध जागेचा प्रभावी वापर याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सहभागी महिलांना सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विविध संशोधन व विस्तार उपक्रमांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील विविध विभागांच्या संशोधन कार्याचे प्रदर्शन, रोपवाटिका व बागेची पाहणी तसेच विविध पिकांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रांना भेट देण्यात आली. यामधून महिलांना घरगुती बागेसाठी उपयुक्त रोपांची निवड, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन व रोपांची निगा याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाली.

घरच्या घरी ताजा, सुरक्षित व विषमुक्त भाजीपाला उपलब्ध झाल्यामुळे कुटुंबाच्या पोषणमूल्यात वाढ होते. तसेच घरगुती बागेमुळे महिलांना बागकामाचा आनंद मिळण्याबरोबरच अतिरिक्त भाजीपाला उत्पादनातून घरगुती खर्चात बचत व संभाव्य आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्य, पोषण, पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी मार्गदर्शकांनी नमूद केले.

या उपक्रमास कृषिरत महिला, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच परिसरातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. महिलांना घराच्या परिसरात उपलब्ध असलेल्या कमी जागेतही नियोजनबद्ध पद्धतीने भाजीपाला, फळे, फुले व औषधी वनस्पतींची लागवड करता यावी, यासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे. प्रत्येक घरात पोषणबाग’ ही संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.














Tuesday, August 18, 2026

शैक्षणिक सहलीतून कृषि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची प्रत्यक्ष अनुभूती

 वनामकृविच्या लिहाखेडी-पालोद कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दक्षिण भारतातील शैक्षणिक सहल यशस्वी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी-पालोद (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील  शासकीय कृषि महाविद्यालयाच्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांची दिनांक ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऊटी, म्हैसूर, बेंगळुरू तसेच तामिळनाडूतील विविध शैक्षणिक, प्रशिक्षण व संशोधन संस्थांना भेटी देऊन कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.

सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च (IIHR), सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CFTRI), तामिळनाडू अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी (TNAU), म्हैसूर येथील सेरिकल्चर संस्था तसेच इतर संबंधित संस्थांना भेटी दिल्या. या भेटींमध्ये विद्यार्थ्यांना फलोत्पादन, अन्नप्रक्रिया, रेशीम उद्योग, कृषि संशोधन, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, प्रशिक्षण सुविधा आणि विविध संशोधन प्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

या शैक्षणिक सहलीत महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ९ विद्यार्थिनी आणि ४१ विद्यार्थी यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मार्गदर्शक म्हणून सहभागी झाले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शैक्षणिक सहलीचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, विविध संस्थांशी समन्वय, प्रवासाचे नियोजन तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता यांचा विचार करून सहलीचे काटेकोर नियोजन करण्यात आले.

सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळावी, विद्यार्थ्यांना आधुनिक कृषि संशोधन व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच कृषि क्षेत्रातील भविष्यातील संधींची माहिती मिळावी, हा या शैक्षणिक सहलीचा प्रमुख उद्देश होता. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध संस्थांमधील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची तसेच संशोधन व तंत्रज्ञानातील नवीन बाबी समजून घेण्याची संधी मिळाली.

ऊटी, म्हैसूर व बेंगळुरू येथील विविध शैक्षणिक व कृषिविषयक स्थळांना भेटी देतानाच विद्यार्थ्यांनी स्थानिक कृषि पद्धती, फलोत्पादन, रेशीम उद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राचाही अभ्यास केला. त्यामुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध आणि संस्मरणीय ठरली.

या यशस्वी शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. आशिष बागडे, डॉ. संतोष ढगे, डॉ. सुरेखा कदम आणि श्री. संदीप इंगळे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहल यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सहभागी विद्यार्थ्यांनी या सहलीमुळे मिळालेला प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या शैक्षणिक तसेच भविष्यातील व्यावसायिक वाटचालीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.









Monday, August 17, 2026

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषि महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती सादर करण्याची तसेच विविध कलामाध्यमांतून आपल्या कल्पना व भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.

या विद्यापीठस्तरीय चित्रकला स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील सिद्धी संतोष रासवे, रिद्धी माणिक रासवे आणि श्रद्धा प्रभाकर अंबोरे यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थिनींनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि कलात्मक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व कलाविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि कलात्मक कौशल्यांना चालना मिळते.

या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी अभिनंदन करून कौतुक केले. विद्यार्थिनींनी भविष्यातही विविध विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्यांच्या विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहेत.







इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेत शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रमुख उपस्थिती

 


भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्था (NSRI) येथे आज दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘सोयाबीन शेती दिन (फिल्ड डे)’ आणि शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी कृषि महाविद्यालय, इंदूरचे अधिष्ठाता डॉ. भरत सिंह तसेच इंदूर जिल्ह्याचे उपसंचालक कृषि श्री. सी. एल. केवडा उपस्थित होते. राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंह यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्मृतिचिन्ह प्रदान करीत सत्कार केला.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी अवलंबिलेल्या पद्धती तसेच विविध कृषि तंत्रज्ञानांच्या वापराबाबत शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील थेट संवादातून क्षेत्रीय समस्या, अनुभव आणि संशोधनाधारित उपाययोजनांवर चर्चा झाली.

यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शेतकरी व मान्यवरांनी संस्थेच्या संशोधन प्रक्षेत्राला तसेच

कृषि - व्यवसाय विकास प्रक्रिया केंद्राला (अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन सेंटर) भेट दिली. यावेळी संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेली विविध कृषि उत्पादने, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित उपक्रमांची पाहणी करून त्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.

या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भा.कृ.अ.प. सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. सुरनर तसेच ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून सोयाबीन पिकाचे अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी मराठवाड्यातील प्रातिनिधिक प्रगतिशील शेतकऱ्यांची भेट घडवून आणण्याच्या उद्देशाने शेतकरी प्रतिनिधी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी श्री. मंगेश देशमुख आणि उद्यान पंडित श्री. प्रताप काळे यांच्यासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी, कृषि क्षेत्रातील अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते.

शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषि विद्यापीठे यांच्यातील संवाद अधिक बळकट करून संशोधनातील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा ‘फिल्ड डे’ कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.