Thursday, September 19, 2013

फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्राचे उद् घाटन

वसंतराव नाइक मराठवाडा कृषि विद्यापीठ गेली चार शतकापासुन कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सेवा देत आहे. विद्यापीठाच्‍या वतीने विद्यापीठ कृषि तंत्रज्ञान प्रसारासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. याकरीता सातत्‍याने आधुनिक पध्‍दती व माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करण्‍यात येतो. या प्रयत्‍नातुनच शेतक-यांच्‍या समस्‍यांचे त्‍यांच्‍या शेतावर निदान करणे व सोडविणे तसेच विद्यापीठाचे तंत्रज्ञान थेट त्‍यांच्‍या बांधावर पोहचविण्‍यासाठी सुसज्‍ज असे फिरते कृषि निदान व प्रदर्शन केंद्र 17 सप्‍टेंबर रोजी रबी पीक शेतकरी मेळाव्‍याच्‍या निमित्‍त भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. अरविंद कुमार यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करून कार्यान्वित करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. के. पी. गोरे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ गोंविदरावजी भराड, मा श्री अनिलराव नखाते, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. व्‍ही. एस. शिंदे, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर आदी उपस्थित होते.
हे वाहन तथा केंद्र अतिशय आधुनिक पध्‍दतीने तयार करण्‍यात आले असुन यात कीड व रोग निदान, माती व पाणी परिक्षण, पशु व दुग्‍ध संवर्धन निदान व चिकित्‍सा आदी सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. यामुळे शेतक-यांच्‍या समस्‍यांचे निदान थेट त्‍यांच्‍या शेतावर होवून त्‍याच ठिकाणी समस्‍यांचे निराकरण करता येउ शकते. तसेच विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाची माहिती शेतक-यांना या केंद्राच्‍या माध्‍यमातुन थेट त्‍यांच्‍या शेतावर उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. यासाठी दोन स्‍पर्शपटल सुविधा संच वाहनात बसविण्‍यात आले आहेत. यामुळे बोटाच्‍या एका स्‍पर्शावर शेतक-यांना शेतीबद्दल आवश्‍यक माहिती मिळणार आहे. वाहनामध्‍ये कृषि तंत्रज्ञान प्रदर्शन, चलचित्र प्रदर्शन आदी कृषि क्षेत्राशी निगडीत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या आहेत. चित्रफित पाहण्‍याची व ऐकण्‍याची तसेच शेतक-यांच्‍या शेतावर किंवा गावात शेतकरी मेळावे, चर्चासत्रे घेण्‍याच्‍या दृष्‍टीने ध्‍वनीक्षेपन यंत्रणेची व्‍यवस्‍थाही वाहनात करण्‍यात आली आहे. वाहनाच्‍या दर्शनी भागात कृषि विद्यापीठाने संशोधित केलेल्‍या विविध वाणांची माहितीही शेतक-यांना होईल, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
सदरिल वाहन विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ के पी गोरे व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली तयार करण्‍यात आले असुन वाहनात सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी डॉ. एन. डी. पवार, डॉ. व्‍ही. डी. पाटील, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. बी. बी. भोसले, डॉ. बी. बी. ठोंबरे, डॉ. डी. एन. धुतराज, डॉ. यु.एम.वाघमारे आदींसह सर्व विभाग प्रमुख व अधिकारी यांनी सहकार्य केले आहे. हे फिरते निदान व प्रशिक्षण केंद्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे तयार करण्‍यात आले असून यासाठी व्‍यवस्‍थापक डॉ. आनंद गोरे, दिगंबर पटाईत, डॉ.भगवान आरबाड, उदय वाईकर यांनी परिश्रम घेतले.