Wednesday, July 7, 2021

विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संघटनेच्या रूपात एकत्रित आल्यास समाज उभारणीचे मोठे कार्य घडु शकते...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍त वनामकृवि, परभणी अॅल्‍युमिनी सदस्‍य नोंदणी अभियानास सुरूवात 


परभणी कृषि विद्यापीठातुन पदवीधर झालेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. शासकीय-अशासकीय संस्‍था, प्रशासकीय क्षेत्रात, बॅकिंग क्षेत्रात, सैनिक दल, खासगी क्षेत्रात तसेच अनेकजण स्‍वयंरोजगार करित असुन कृषि उद्योजक आहेत. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा वापर करणारे प्रगतशील शेतकरी आहेत. कृषि पदवीधर त्‍यास आपण अॅग्रीकोस म्‍हणतो त्‍याचे म‍हाविद्यालयीन वर्गमित्राचे मोठे जिव्‍हाळाचे नाते असते. मातृसंस्‍थेबाबतची त्‍यांची आस्‍था असते. अनेक सामाजिक उपक्रमात ते हिरारिने सहभाग घेतात. जर हे संघटनेच्‍या रूपाने एकत्रित आल्‍यास समाज उभारणीचे मोठे कार्य आपण करू शकतो, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन 2021-22 हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आहे याचे औचित्‍य साधुन विद्यापीठ स्‍थापनेपासुनच्‍या सर्व माजी विद्यार्थ्‍यांची अॅल्‍यमिनी सदस्‍य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दिनांक 7 जुलै रोजी झाले, त्‍या प्रसंगी ते बोलत हेाते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन विद्यापीठाचे माजी विद्यार्थी अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, माजी विद्यार्थी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार, स्‍टेट बॅक ऑफ इंडियाचे मकृवि शाखाचे व्‍यवस्‍थापक श्री शिवराम खेडुलकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरज कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ बी व्‍ही आसेवार, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, ते स्‍वत: परभणी कृषि महाविद्यालयाचे सन 1981 च्‍या बॅचेचे विद्यार्थी आहेत, प्रशासकीय पदावर काम करतांना शेतकरी बांधवासाठी काम करण्‍याची मोठी संधी मला मिळाली. दोन अॅग्रीकोस मित्रात मोठा जिव्‍हाळा असतो, आजही त्‍यांचे मातीशी नात जपुन आहे. सामाजिक बांधिलकी व अॅग्रीकोस यांचे अतुट नाते आहे. विद्यापीठातील काही जमीन कृषि उद्योजकांना फुट पार्क उभारणी करिता दिल्‍यास शेतकरी व कृषि उद्योजकांचा फायदा होऊ शकेल. विद्यापीठ राबवित असलेला हरित विद्यापीठ उपक्रमास अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याप्रमाणे चांगल्‍या सामाजिक उपक्रम राबविण्‍याकरिता अनेक माजी विद्यार्थी पुढे येतील, यातुन विधायक कार्य आपण करू शकु.

एसबीआय शाखा व्‍यवस्‍थापक श्री शिवराम खेडुलकर यांनी अॅल्‍युमिनी सदस्‍य नोंदणी करिता लवकर एसबीआय बॅक ऑनलाईन सुविधा उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे सांगितले.

प्रास्‍ताविकात डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, विद्यापीठात प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातुन येतात, अनेक वेळेस घरची परिस्थिती हलाखीची असल्‍यामुळे शिक्षणात अडथळे येतात, यात बरेच वेळेस प्राध्‍यापक मंडळी या विद्यार्थ्‍यांना मदत करतात. परंतु सर्व माजी विद्यार्थ्‍यांनी एकत्रित संघटीत प्रयत्‍न केल्‍यास गरजु विद्यार्थ्‍यांना आपण चांगल्‍या प्रकारे मदत करू शकतो, हा प्रामाणिक उद्देश ठेऊन माजी विद्यार्थ्‍यांची अॅल्‍युमिनी स्‍थापन करण्‍यात आली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 

यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी आपली स्‍वत:ची प्रथम अॅल्‍युमिनी सदस्‍यत्‍व नोंदणी केली, त्‍याबाबत त्‍यांना सदस्‍यत्‍व प्रमाणपत्र देण्‍यात आले.  तसेच  अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, व माजी विद्यार्थी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार यांनी ही सदस्‍यत्‍व नोंदणी केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.