Saturday, July 24, 2021

ज्वार संशोधन केंद्र निर्मित जैविक उत्पादने ट्रायकोबुस्ट व मेटारायझीयमला शेतक-यांमध्‍ये वाढती मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि़द्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र, परभणी अंतर्गत यावर्षी जैविक उत्पादन विभागाच्‍या वतीने ट्रायकोबुस्ट व मेटारायझीयम या जैविक बुरशी व किडनाशक निर्मिती करण्‍यात येत असुन सदरिल उत्‍पादनास शेतक-यांमध्‍ये मागणी वाढत आहे. या जैविक बुरशी व कीडनाशकाचा सोयाबीन, तुर, हळद, कापुस, अद्रक आदी विविध पिकातील मर रोग, मुळकुज, कंदकुज, हुमणी  व्यवस्थापनासाठी मोठया उपयोग होत आहे.  दिनांक 23 जुलै जिंतुर, वसमत, कळमनुरी, मानवत, परभणी या तालुक्यातील विविध गावातील शेतकरी बंधु खरेदी साठी आले होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे, ज्वार रोगशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे, , ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मोहम्मद ईलियास, डॉ. एल. एन. जावळे, प्रा. प्रितम भुतडा, प्रा. अंबिका मोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधुन सदरिल जैविक उत्‍पादने वापरामुळे उत्‍पादन खर्चात बचत होऊन किड व रोग व्‍यवस्‍थापन करण्‍यास चांगली मदत होते, असे सांगितले.