वनामकृवि व रिलायंस फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २० जुलै रोजी ऑडिओ कॉन्फरन्स व्दारे परभणी जिल्ह्यातील मौजे साटला येथील शेतकरी बांधवाशी विद्यापीठ शास्त्रज्ञांनी संवाद साधला. यात विस्तार कृषी विद्यावेता तथा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. जी. डी. गडदे व किटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात डॉ. जी. डी. गडदे म्हणाले की, सोयाबीन मधील पिवळेपणा कमी करण्यासाठी बाजारात मिळणारे ग्रेड-२ चे सूक्ष्म मूलद्रव्यची फवारणी करावी तसेच पिकांमध्ये साचलेल्या जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा. कपाशीमध्ये अन्नद्रव्याची पूर्तता वेळेवर करावी, सोयाबीनमध्ये उगवतीपश्चात योग्य पध्दतीचा किंवा तणनाशकाचा वापर करून पीक तणविरहीत ठेवण्याचा सल्ला दिला.
डॉ. डी. डी. पटाईत यांनी कपाशी व सोयाबीन वरील मावा, चक्रीभुंगा, खोडमाशी, पैसा (वाणी) आदी कींडीचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
सध्या खरीप हंगामातील पीक हे वाढीच्या अवस्थेत असुन सोयाबीन कापूस पिकांमध्ये पिवळेपणा तसेच विविध कीड व रोग यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ऑडिओ कॉन्फरन्स व्दारे सोयाबीन व कापूस पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच किडी व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक दिपक केकान व कार्यक्रम सहाय्यक रामाजी राऊत यांनी केले होते. रिलायन्स फाउंडेशनकडून शेतीसंबंधीत विविध गावातील शेतकरी बांधवाच्या समस्या ओळखुन वेळोवेळी ऑडिओ कॉन्फरन्स व्दारे चर्चासत्राचे आयोजित केले जाते. कार्यक्रमास मौजे साटला गावातील शेतकरी उपस्थित होते.