Thursday, July 8, 2021

क्रॉपसॅप अंतर्गत विभागीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2021-22 अंतर्गत मराठवाडयातील कृषि अधिकारी व कर्मचारी यांच्‍या करिता कोरोना संक्रमणाच्‍या पार्श्‍वभुमीवर ऑनलाईन प्रशिक्षणाचे दिनांक जुलै रोजी आयोजन करण्यात आल होत.

प्रशिक्षणाच्‍यादघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ.दिनकर जाधव,  लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, कृषि किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, परभणी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.संतोष आळसे, क्रॉपसॅपचे  समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मागिल दहा वर्षापासुन क्रॉपसॅप प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात येत असुन मराठवाडयातील विविध पिकांवर येणारी कीडींचे व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोह‍चविण्‍याचे चांगले कार्य होत आहे. या प्रकल्‍पामुळे मित्र किटकाचे संवर्धन कसे करावे, निंबोळी अर्काचा वापर करुन कमीत कमी घातक किटकनाशकाचा वापर करुन पर्यावरणस्नेही किड व्यवस्थापन कसे करावे याबाबत वेळोबेळी मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर म्‍हणाले की, किड-रोग सर्वेक्षण योग्य प्रकारे करून त्यानुसार विद्यापीठाकडुन व कृषि विभागाकडुन व्यवस्थापनाबाबत वेळोवेळी किड रोग नियोजनाचा सल्ला शेतक-यांना देण्यात यावा. यावर्षीच्‍या हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मक्यावरील लष्करी अळी यावर विशेष लक्ष देण्यात यावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव महणाले की, कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचा-यांनी किड रोग हॉटस्पॉट ओळखून व त्या ठिकाणी जाउन शेतक-यांना किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करावे. मकावरील लष्करी अळीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, तरी त्याबाबत सतर्क राहून नियंत्रणाचे सल्ले वेळोवेळी दयावे. व शास्त्रज्ञ व कृषि विभाग दोघांनी क्षेत्रीय क्षेत्रावर जाउन काम करावे.

लातुर विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर मार्गदर्शनात सांगितले की कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना किड सर्वेक्षण हंगामाच्या सुरुवातीपासुन सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वेक्षणातून आर्थिक नुकसान पातळी कळावी व त्यानुसार किड रोग नियंत्रणात सल्ले शेतक-यांना गाव पातळीवर ग्रामपंचायत फलकावर लावावीत तसे  दुरध्वनी संदेश वेळोवेळी द्यावेत. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. संजीव बंटेवाड यांनी कीड सर्वेक्षणाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले. तांत्रिक सत्रात कपाशीवरील किडींचे व्यवस्थापन या विषयावर डॉ. बस्वराज भेदे यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी मका, ज्वारी, व उस पिकावरील लष्करीअळीचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. संजीव बंटेवाड यांनी तुर पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. सोयाबीन पिकावरील किडींचे व्यवस्थापनावर डॉ. अंनत लाड, सोयाबिन पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. श्रीकृष्ण झगडे, कापुस आणि तुर पिकावरील रोग व्यवस्थापन  याविषयावर डॉ. संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. क्रॉपसॅप प्रपत्र नोंदणी, प्रात्याक्षिक व तपासणी याबाबत डॉ. अनंत लाड व डॉ. राजरतन खंदारे यांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील चारशे पेक्षा अधिक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक आदींनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजोग बोकन, श्री. दिपक लाड व श्री.मधुकर मांडगे यांनी परिश्रम घेतले.