Thursday, July 15, 2021

दिनांक ११ जुलै रोजीच्या अतिवृष्टीमुळे वनामकृवि अंतर्गत परभणी मुख्यालयातील बीजोत्पादन कार्यक्रमाचे मोठे नुकसान


दिनांक ११ जुलै रोजीच्‍या झालेल्‍या अतिवृष्टीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी मुख्यालयाच्या विविध संशोधन केंद्रे व इतर कार्यालये अंतर्गत घेण्‍यात आलेल्‍या या वर्षीच्‍या खरीप हंगामातील बीजोत्पादन कार्यक्रम धोक्‍यात आला आहे. विद्यापीठाच्या वतीने खरीप २०२१ हंगामात एकुण ६२३.४६ हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांच्या मुख्यत: सोयाबीन, तूर, मुग व उडीद आदी पिकांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु दिनांक ११ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे (२३२.५ मिमी) विद्यापीठाच्या मुख्यालयी राबविण्यात येत असलेल्या १०८.० हेक्‍टरी (१७.३२ टक्के) क्षेत्रावरील बीजोत्पादन कार्यक्रम बाधित झाला आहे. विद्यापीठ मुख्यालयातील पाउसाची वार्षिक सरासरी ७७३.०० मिमी इतका असून यावर्षी दिनांक १ जून ते दिनांक १४ जुलै पर्यंत ७४०.० मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्‍हणजेचे जून व जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्‍या ९५.७ टक्के एवढा पाउस हा झाला आहे.

या अनुषंगाने कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १३ जुलै रोजी विविध संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी, कार्यालय प्रमुख, विविध विषयांचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ आदींची आयोजित बैठकीत नुकसानीचा आढावा घेण्‍यात आला. यात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ बीजोत्पादन कार्यक्रमाच्या केंद्र / कार्यालय निहाय नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन व मुग बीजोत्पादनाचे क्षेत्र सर्वात जास्त बाधित झाले असल्‍याचे निदर्शनास आले आहे. बैठकीत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी नियोजित बीजोत्पादन कार्यक्रमाचे उदिष्ट गाठण्यासाठी आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. 

या बैठकीत सर्व संबंधीतांना बीजोत्‍पादनाचे उदिष्‍ट गाठण्‍याकरिता बाधित क्षेत्रातून पावसाचे साचलेले पाणी त्‍वरीत निचरा करून घेणे व परिस्थिती लक्षात घेवून दुबार पेरणी करण्यात यावी,असे सुचित करण्‍यात आले असुन पावसामुळे बाधित झालेल्या प्रत्येक प्रक्षेत्रावर जेथे शक्य असेल तेथे वापसास्थिती आल्यानंतर आहे त्याच पिक / वाणाची दुबार पेरणी करून घ्यावी तसेच अबाधित क्षेत्रावर खुरपणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे शेत जमीन परिस्थीतीनुसार हाती घेवून पिक परिस्थित सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, अश्‍या सुचना देण्‍यात आल्‍या. दिनांक १३ जुलै रोजी देखिल ५२.३० मिमी पाउस झाल्यामुळे बीजोत्पादन कार्यक्रमाचे अधिक क्षेत्र बाधित होण्याची शक्यता असल्‍याचे विद्यापीठाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.