Thursday, July 1, 2021

परभणी कृषि विद्यापीठाचे वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन अभियान अत्यंत स्युत्य उपक्रम.... जिल्हा्धिकारी मा श्री दिपक मुगळीकर

कृषि दिनानिमित्‍त वनामकृवित वृक्षलागवड कार्यक्रमात प्रतिपादन

कृषी हेच भारतीय संस्कृतीचे मुळ आहे, या कृषि संस्कृतीपासुन माणुस दुर जात आहे. यामुळे मानवास अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पर्यावरण समतोल राखायचे असेल तर वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. प्राणवायु शिवाय मानव जात जगु शकत नाही, हवेतील ऑक्सीजन पातळीच्‍या समतोलाकरिता वृक्षलागवड करणे ही काळाची नव्‍हे तर कायमची गरज आहे. प्रत्‍येक नागरीकांनी वृक्षलागवडीची व संगोपनाची जबाबदारी घेतली पाहिजे. वृक्षाने नटलेला परभणी कृषि विद्यापीठाचा परिसर पाहुन अत्‍यंत प्रसन्‍न वाटते, विद्यापीठाचा वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रम अत्‍यंत स्‍त्‍युत्‍य उपक्रम आहे, असे प्रतिपादन परभणी जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी मा श्री दिपक मुगळीकर यांनी केले.

महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या जयंतीचे औजित्‍य साधुन दिनांक 1 जुलै रोजी कृषि दिनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास परभणीचे आमदार मा डॉ राहुल पाटील यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. यावेळी मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार, अतिरीक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, जिल्‍हा वनअधिकारी श्री पी सी वाघचौरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, डॉ केशव खटींग, डॉ कात्‍नेश्‍वरकर, प्रगतशील शेतकरी श्री सोपानराव अवचार प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यापीठ वृक्षलागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी परभणीचे आमदार मा श्री राहुल पाटिल म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ केवळ वृक्षलागवड करून थांबले नाही तर वृक्षसंवर्धन केले आहे. विद्यापीठ परिसरात आमदार निधीतुन उभारण्‍यात आलेल्‍या खुली व्‍यायामशाळेच्‍या बाजुस वड व पिंपळ वृक्षाच्‍या लागवडीमुळे ऑक्सीजन हब निर्माण होऊन व्‍यायाम करणा-या नागरिकांना भरपुर प्राणवायु मिळेल, असे ते म्‍हणाले.  

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वृक्ष ही समाजाची फुफ्फुसे आहेत, झाडांवर प्रेम करा, झाडे आपणाशी बोलतात. गेल्‍या तीन वर्षापासुन परभणी कृषि विद्यापीठ वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिम राबवत असुन संपुर्ण मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत संशोधन केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे, महाविद्यालयात मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्‍यात आली आहे. विद्यापीठात घनदाट वृक्षलागवड करून ग्रीन टनेल तयार करण्‍यात येत आहे, ऑक्सीजन हॅब निर्माण केले जात आहे. यासाठी विद्यापीठ अधिकारी -कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, शहरातील सामान्‍य नागरिकही हातभार लावत आहे, हे कार्य आपण सामुदायिकरित्‍या केल्‍यास अधिक प्रबळ होईल, याचा लाभ पुढे अनेक पिढयांना होईल.

यावेळी परिसरात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते वृक्ष लागवड करण्‍यात आली असुन देवगिरी वसतीगृहाच्‍या शेजारी पन्‍नास वड, पन्‍नास पिंपळ व पाचशे कांचन वृक्षाची लागवड करून ऑक्सीजन हॅब निर्माण करण्‍यात येणार आहे. यावेळी विद्यापीठ स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औजित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालयाचे सन 1981-82 बॅचचे माजी विद्यार्थीं सर्वांनी मिळुण एकुण दिड लाख रूपयाचा निधी विद्यापीठाच्‍या वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन उपक्रमास दिला. यावेळी माजी विद्यार्थी श्री हरिश्‍चंद्र झनझन, डॉ निलकंठ डाके, डॉ किरण अष्‍टपुत्रे, श्री नंदकुमार चव्‍हाण, डॉ जे ई जहागिरदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ हिराकांत काळपांडे यांनी सांगितले की, वृक्षलागवड करतांना विविध प्रकाराच्‍या झाडांची निवड करण्‍यात आली असुन पक्षी व मधुमक्षिष्‍का आदिवासात वाढ करणे, दिर्घायुष्‍यी वृक्ष, विविध फुले देणारी वृक्ष आदींचा विचार करून लागवड करण्‍यात आली आहे. सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जयकुमार देशमुख, डॉ एस एल कल्‍याणकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.