Saturday, January 5, 2019

यशस्‍वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठ तंत्र अवगत असणे आवश्यक..…प्राचार्य डॉ. डी.एन. गोखले

वनामकृवित आयोजित नांदेड जिल्हयासाठीच्‍या दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांच्‍या वतीने मराठवाडयातील चार जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यातील नांदेड जिल्हयाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन दिनांक 4 जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. शरदराव हिवाळे, डॉ. स्मिता सोळंके, श्री. संजय देशमूख (नोका, पुणे), डॉ. सतिश भोंडे, श्री. महेश सोनकुळ, डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी.एन. गोखले म्हणाले की, मराठवारडयातील कोरडवाहु शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत. यातील शेतमालाचा बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख समस्या आहेत. अशा वेळी कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता यासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने पाहत आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना लाभ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी योग्य बियाणे, आंतरपिक पध्दती, पिकांची फेरपालट आदी मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सेंद्रीय शेतीसाठी महत्वाचे आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्‍यातील ऊर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यशस्‍वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठेचे तंत्र अवगत करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
मा. श्री. शरदराव हिवाळे यांनी भाषणात सांगितले की, शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती केल्यास फायदेशीर होईल. गट शेतीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था सोपी जावी म्हणून विद्यापिठ निश्चित पाठीशी राहील. श्री. संजय देशमुख यांनी सांगितले की, नांदेड जिल्हा सेंद्रीय शेतीच्या अवलंबामध्ये अग्रेसर असुन जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेती करणारे आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल. तसेच डॉ. द इस्माईल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, रासायनिक खते व किटकनाशकांचा अयोग्‍य व अतिरेक वापरामूळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि किटकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढते आहे, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये श्री संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, श्री. महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचे व सापळयांचे फायदे उपयोग व महत्व, डॉ. सतिश भोंडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये माती परिक्षणाचे महत्व, डॉ. सी.व्ही. आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ. .टी शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापण तसेच डॉ. .एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
सदरिल प्रशिक्षण कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, January 3, 2019

मराठवाडयातील पशुधनामध्ये सेंद्रीय शेतीला आधार देण्याची क्षमता.....प्राचार्य डॉ. नितिन मार्कंडेय

वनामकृवित आयोजित हिंगोली जिल्हयासाठीच्‍या दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील आठही जिल्हयांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 2 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हयासाठी आयोजित कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी परभणी पशुवैद्यकीय महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. नितिन मार्कंडेय हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संशोधन उपसंचालक डॉ. डी. एस. पेरके, हिंगोली उपविभागीय कृषि अधिकारी श्री बी. एस. कच्छवे, डॉ. आर. एन. खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय म्‍हणाले की, पशुधन आणि त्यापासूनच्या उपउत्पादनामूळे शेतीची क्षमता वाढविणे, कर्ब वाढविणे तसेच जमिनीची सुपिकता वाढविण्या बरोबरच उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोगी ठरेल. मराठवाडयातील हवामान, परिस्थिती पशुधनाच्या दृष्टीने पोषक असून सेंद्रीय शेतीला आधार देता येईल. मराठवाडयातील पशुधनामध्ये दुग्धोत्पादन व उपउत्पादने देण्याची मोठी क्षमता असुन ही क्षमता शेतकऱ्यांनी ओळखून योग्य व्यवस्थापन तंत्राचा वापर केल्यास शेतकरी सेंद्रीय शेती यशस्वीपणे करू शकतील. शुध्द पैदास, योग्य व्यवस्थापन तंत्र, वेळेचे नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास या चतू:सुत्रीचा वापर केल्यास शेतकरी आर्थिक समृध्दी प्राप्त करता येईल, असे सांगितले.
संशोधन उपसंचालक डॉ. ङि एस. पेरके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकऱ्यांनी प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी, बाजारपेठेचा अभ्यास करावा व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचाही विचार करावा. सेंद्रीय उत्पादनास स्थानिक तसेच मोठया शहरात मोठी मागणी आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी मागणीनुसार अभ्यास करून सेंद्रीय शेतीमध्ये उत्पादन घ्यावे.
हिंगोलीचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. बी.एस. कच्छवे यांनी शेतमकरी बांधवांनी गट तयार करून सेंद्रीय शेतीमध्ये निविष्ठा निर्मिती करावी आणि लागवड तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे सांगितले. डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांनी कोणत्याही एका ब्रँडखाली काम केल्यास योग्य लाभ होईल असे सांगितले व भविष्यात आपणास एकत्रित काम करावे लागेल असेही सांगितले.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ. बी. व्ही. भेदे यांनी जैविक कीड व्यवस्थापन, डॉ. . टी. दौंडे यांनी जैविक रोग व्यवस्थापन, श्री. एस. एन. मोहिते यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण व श्री. उदय वाईकर यांनी सेंद्रीय शेतीमधील संधी तसेच घडामोडी, डॉ. एस. . जावळे यांनी जैविक निविष्ठा निर्मिती व सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास शेतकऱ्यांना भेट देऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस.एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये अवजारांचा सुयोग्य व कार्यक्षम वापर, डॉ. सौ. एस.एस. धुरगुडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचा उपयोग व महत्व, डॉ. के.टी. आपेट यांनी जैविक बूरशी संवर्धनाची निर्मिती व उपयोग व संशोधन केंद्रास भेट देवून शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
समारंभाप्रसंगी मनोगतात प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी विद्यापिठाच्या तंत्रज्ञानामूळे अनेक शेतकरी उभे राहिल्‍याचे सांगितले, तर अनिलराव कदम  कपिल सोनटक्के यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. कार्यक्रामचे सुत्रसंचालन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित कदम यांनी केले.
सदरिल प्रशिक्षण कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

महिलाच सृष्टीच्या निर्मात्या.....औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. अॅड. श्रीमती देवयानीताई डोणगांवकर

वनामकृविच्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित महिला शेतकरी मेळावा उत्‍साहात संपन्‍न


मा. अॅड. श्रीमती देवयानीताई डोणगांवकर
श्रीमती कांचनताई परुळेकर
कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण

महिलांनी न्युनगंड सोडायला पाहिजे, महिला या सृष्टीच्या निर्मात्या आहेत. शेतीतील मुख्य कामांमध्ये महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आज महिला शिक्षण घेवून अनेक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. आज केवळ पुस्तिकी शिक्षण घेवून भागणार नाही, आपणास कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. अॅड. श्रीमती देवयानीताई डोणगांवकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दि. 3 जानेवारी आयोजीत महिला शेतकरी मेळाव्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर व्यासपीठावर कोल्हापुर येथील स्वंयमसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर, कृषिभुषण श्री विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री तुकाराम मोटे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटंगावकर, सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, प्राचार्य डॉ. किरण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषि विद्यापीठ अंर्तगत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाने शेतीत काबाडकष्ट करणा­ऱ्या महिलांसाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे, या तंत्रज्ञानाचा वापर महिलांनी करावा. आज दैनंदिन पोषण अन्नामध्ये भरड धान्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. या दृष्टीने परभणी कृषि विद्यापीठाने लोह व जस्त यांचे प्रमाण जास्त असणारा देशातील पहिला जैवसंपृक्त ज्वारीचा वाण परभणी शक्ती विकसीत केला आहे. यापासून मुल्यवर्धित पदार्थ तयार करून महिला बचत गटांनी उद्योग सुरु करावेत. शहरातील मॉलमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले विविध पदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र दालन निर्माण करण्याची गरज आहे. औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात प्रामुख्याने महिला शास्त्रज्ञांचा समावेश असून महिला सक्षमीकरणासाठी सदैव प्रयत्नशील असतात.
स्वंयमसिध्दा संस्थेच्या संचालिका श्रीमती कांचनताई परुळेकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण झाल्याशिवाय आपला देश आर्थिक महासत्ता होवू शकत नाही. महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने प्रबोधन, प्रशिक्षण व मार्गदर्शनाची  आवश्यकता आहे. महिलांनी स्वावलंबी व्हावे, महिला शिकली तर संपुर्ण कुटुंब शिकते. महिलानी उद्योग क्षेत्रामध्ये उतरून कृतीवीर व्हा, बचत गटाच्या माध्यमातून दर्जात्मक विविध पदार्थ तयार करून रास्त किमतीत विक्री करा. नवीन तंत्रज्ञानाची कास धरा. महिलांमध्ये नेतृत्वगुण पेरावे लागतील. महिलांमध्ये राजकीय साक्षरता व अर्थ साक्षरता झाली पाहिजे. मोठे स्वप्न पहा, स्वत:चे मालक स्वत: व्हा, केवळ वाचावीर होवू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कृषिभुषण श्री विजयअण्णा बोराडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, औरंगाबाद जिल्हा कृषि अधिकारी श्री तुकाराम मोटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात विद्यापीठ प्रकाशीत मासिक शेतीभाती महिला विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. हेमांगिनी सरंबेकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले तर आभार प्रा. दिप्ती पाटंगावकर यांनी मानले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी सुलभ साधने यावर डॉ. जयश्री झेंड यांनी तर फळे-भाजीपाल्याची साठवणूक व प्रक्रिया यावर डॉ. फरझाना फारुखी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषि प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते, यात कृषि विज्ञान केंद्र पुरस्कृत महिला उद्योजिकांच्या दालनाचा समावेश होता. मेळाव्यास महिला शेतकरी, शेतकरी बांधव, विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


यशस्वी सेंद्रीय शेतीसाठी संयम आणि सातत्य हवे.......माजी कृषि संचालक श्री. अनंतराव जावळे

वनामकृवित आयोजित हिंगोली जिल्‍हयातील शेतक-यांसाठीच्‍या सेंद्रीय शेती प्रशिक्षण वर्गात प्रतिपादन
सेंद्रीय उत्पादनास योग्य ते नामकरण करणे व विक्री व्यवस्था राबविणे गरजेचे असुन योग्य माहिती घेणे निविष्‍ठांची निर्मिती करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती ही एक दिर्घकालीन चालणारी प्रक्रिया असून यात यश मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम व सातत्य अंगी बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी कृषि संचालक डॉ. अनंतराव जावळे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील चार जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयाच्‍या शेतक-यांसाठी आयोजित प्रशिक्षण वर्गाचे दिनांक 1 जानेवारी रोजी माजी कृषि संचालक डॉ. अनंतराव जावळे यांच्‍या हस्‍ते झाले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर कृषिभूषण श्री. तूकाराम दहे, डॉ. एस. एन. सोळंकी, डॉ. यु. एन. आळसे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. आर.एन. खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अनंतराव जावळे पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये विविध घटकांचे एकात्मिकपणे संगोपन करण्यासाठी एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. विषमूक्त व आरोग्यदायी सेंद्रीय उत्पादनाचा वापर आहारात होण्यासाठी सेंद्रीय शेतीसाठी मोठी संधी आहे. सात्विक आहारातून सात्विक विचार व आचार होवून पुढे राष्ट्र निर्माणास मोठा उपयोग होतो. प्रगतशील शेतकऱ्यांनीही सेंद्रीय शेती प्रसारात पूढे आले पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्यास आलेले अनूभव प्रकर्षाने एकमेकांस सांगणे आवश्यक आहे. विकसीत तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी प्रत्यक्ष शेतीमध्ये झाली पाहिजे. तंत्रज्ञान प्रसारातील त्रूटी दूर करणे आवश्यक आहे आणि यासाठी कृषि क्षेत्रातील सर्वांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

यावेळी डॉ. यू.एन. आळसे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, बाजारात विविध प्रकारच्या सेंद्रीय निविष्‍ठा उपलब्ध आहेत त्याबाबत योग्य ती माहिती घेणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे. डॉ. राजेश भालेराव यांनी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये पिकनिहाय तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा. कृषिभुषण श्री. तूकाराम दहे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये चांगले उत्पादन घेवून त्याचे रूपांतर चांगल्‍या उत्पन्नात करता येणे शक्य असल्‍याचे सांगितले. डॉ. एस.एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये सौर ऊर्जा, गोबर गॅस यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल असे सांगीतले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्‍व सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये डॉ. यु. एन. आळसे यांनी सेंद्रीय पीक लागवड तंत्रज्ञान, डॉ. राजेश भालेराव यांनी गांडूळ खत निर्मिती, डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी सेंद्रीय पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, प्रा. आर. डी. बघेले यांनी सेंद्रीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, डॉ. . एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास शेतकऱ्यांची भेट देवून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रमास हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती, यामध्ये अनिल कदम, प्रभाकर वडकूते, पंजाब वडकूते, रामेश्वर मांडगे, विष्णू काळे, कृषि विभागाचे श्री. घूगे, श्री. निकम आदींचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, प्रसाद वसमतकर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी यांनी परिश्रम घेतले