व्यसनमुक्त युवकच सक्षम भारताचे भविष्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
‘विकसित भारत संकल्प अभियान’
अंतर्गत ‘नशामुक्त युवा’ या विशेष
अभियानाची सुरुवात देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या
शुभहस्ते झाली. या निमित्ताने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय
पंतप्रधानांनी देशभरातील युवकांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत नशामुक्तीचे महत्त्व
अधोरेखित केले व युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी येथे
आयोजित करण्यात आले. या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी
तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी
कल्याण अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि
मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
यावेळी सर्वांनी नशामुक्तीची शपथ घेतली तसेच विद्यापीठाच्या
सलग्न आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातील ६०१२ विद्यार्थ्यांनी माय भारत (My Bharat) पोर्टलवर नोंदणी करून ‘विकसित भारतासाठी
नशामुक्त युवा’ ची प्रतिज्ञा घेवून प्रमाणपत्र प्राप्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. मार्गदर्शनात त्यांनी युवकशक्ती ही
विकसित भारताच्या निर्मितीची सर्वात मोठी ताकद असल्याचे अधोरेखित केले. व्यसनाधीनता
ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीलाही
बाधा आणणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या
कोणत्याही प्रकारापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्यसंपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा
स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षणासोबतच
नैतिक मूल्ये, आत्मसंयम आणि राष्ट्रसेवेची भावना
जोपासून व्यसनमुक्त, सुदृढ आणि सक्षम भारताच्या उभारणीत
प्रत्येक युवकाने सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी
संदेश त्यांनी दिला.
प्रमुख पाहुणे तथा विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ.
बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘नशामुक्त भारत’, शिस्त, वक्तशीरपणा
आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर सखोल विचार मांडले. युवा पिढीने
व्यसनाधीनतेपासून दूर राहून सुदृढ व निरोगी समाजाच्या निर्मितीत सक्रिय योगदान
द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. सय्यद रहेमान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित
होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सुसंस्कृत जीवनशैली आणि
चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले. उत्तम संस्कारांचा अंगीकार करून देशाचे
आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण
वैद्य यांनी
‘नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, विकसित आणि
सशक्त भारताच्या निर्मितीसाठी तरुणाईचे निरोगी, सुदृढ आणि
व्यसनमुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रारंभी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी
प्रास्ताविक करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे
तसेच युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी अशा जनजागृतीपर अभियानांचे
महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाईट सवयींचे नव्हे, तर चांगल्या
विचारांचे, ज्ञानाचे आणि
समाजोपयोगी कार्याचे व्यसन जडवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी
दिला.
कार्यक्रमास अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. राजेश
क्षीरसागर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ
खंदारे तसेच
सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता
गायकवाड यांची प्रमुख
उपस्थिती होती.
ऑनलाईन थेट प्रक्षेपण डॉ. संतोष
फुलारी यांनी
यशस्वीरीत्या हाताळले. सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष
शृंगारे यांनी मानले.
या अभियानाला विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला. कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न
तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. शंकर पुरी, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. खंडागळे, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व कृषी महाविद्यालय, परभणी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)


