वनामकृवित प्रजासत्ताक दिन साजरा
विद्यापीठ उभारणी असो की चालविणे असे ही सात्यत्याने घडणारी प्रक्रिया आहे. सर्वांनी काही मुल्यांची जाणवीपुर्वक जोपासना करणे गरजेचे आहे, विद्यापीठ केवळ बौध्दीक क्षमतेवर मोठे होत नाही, बौध्दीकक्षमता उच्चप्रतीची तर असलीच पाहिजे, त्याचबरोबर समर्पित भावनेने काम करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, नैतिक मुल्याचे कठोर पालनातुनच विद्यापीठासारख्या संस्था उभ्या राहतात. संपुर्ण समाज संस्कार करणारी संस्था म्हणुन कुटुंब संस्थेनंतर शैक्षणिक संस्थेकडे अतिशय आशेने पाहत आहे, ही आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी व कर्तव्य आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी प्रजासत्ताक दिनांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचे सामुहिकरित्या वाचन करण्यात आले.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, यावर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि विद्यापीठ स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत. गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाच्या संकटास तोंड देत आहोत, याकाळात तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन विद्यापीठाचे कृषि संशोधन, शिक्षण व विस्तार कार्य चालुच आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन सातत्याने विद्यार्थी व शेतकरी बांधवाच्या संपर्कात आहोत. प्राध्यापकांचे अध्यापनाचे कार्य चालुच असुन संशोधन कार्य कोठेही थांबलेले नाही, बीजोत्पादनची चांगली कामगिरी यावर्षी आपण करू शकला. चारही कृषि विद्यापीठाची संयुक्त संशोधन बैठक व विद्यापीठाचा पदवीदान समारंभ उत्कृष्टपणे पार पडला, हे सर्व सामुदायिक प्रयत्नाचा व तंत्रज्ञानावरील विश्वासाचे प्रतिक आहे. मर्यादित मनुष्यबळात देखिल आपण कर्तव्यात कोठेही कमी पडत नाहीत. भविष्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी सक्षमपणे सर्वांना उभे राहवायाचे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.