Friday, January 7, 2022

हरभरा पिकावरील घाटे अळीचे वेळीच करा व्यवस्थापन...... वनामकृवितील कृषि किटकशास्‍त्रांचा सल्‍ला

सध्या मराठवाडयात ढगाळ वातावरण असून बऱ्याचशा भागात हरभरा पीक घाटे अवस्थेत आहे, काही भागात घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा प्रादुर्भाव दिसत आहे. घाटेअळीमुळे हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये सर्वात मोठी घट येऊ शकते, त्यामुळे योग्य वेळी व्यवस्थापन करण्‍याचा  सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागातील शास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

घाटेअळी हि कीड बहुभक्षी असून विशेषतःपीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत प्रादुर्भाव नुकसानकारक ठरतो. लहान अळ्या सुरवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यात छिद्र पाडून त्यात डोके खुपसून आतील दाणे खातात. साधारणतः एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते. शेताच्या बांधावरील कोळशी, रानभेंडी,पेटारी ही पर्यायी खाद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एचएनपीव्ही ५०० एल.. १ मिली प्रति लिटर पाण्यात ५ ग्राम नीळ टाकून सायंकाळी फवारणी करावी. हि फवारणी पिकावर प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी व्यवस्थापन होते. तसेच बिव्हेरिया बॅसियाना १ टक्के विद्राव्य ६ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.या अळीची आर्थिक नुकसान पातळी म्‍हणजेचे २ अळ्या प्रति मीटर ओळीत किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस आढळल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ०.४४ ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी. १ मि.ली. किंवा फ्ल्यूबॅडामाईड २० डब्ल्यूजी ०.५ ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ०.२५ मिली प्रति लिटर पाणी फवारणी करावी.