तुळजापुर कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ऑनलाईन महिला शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन
मराठवाडयात सोयाबीनचे भरपूर क्षेत्र
असून सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण 42 टक्के
असल्यामुळे त्यापासून विविध पोषणवर्धक उपपदार्थ बनविता येवु शकतात. शेतकरी महिलांनी
शेळीपालन, कुक्कुटपालन, गायपालन,
म्हैसपालन, मधुमक्षिका पालन, पोषणबाग निर्मिती आदि शेतीपूरक उद्योग धंद्याकडे लक्ष केंद्रीत करावे. आज
विविध भरडधान्यंच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करत आहोत, भरडधान्यांचे उत्पादन वाढवून
त्यांचा वापर विविध लघुउद्योगांमध्ये करता येईल. महिलांनी शेती उत्पादन आधारित
विविध पदार्थ तयार करून त्यांची विक्री करावी. शेतकरी महिलांनी जे विकेल तेच
पिकविण्याकडे भर द्यावा, असा सल्ला विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर
यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्र आणि
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान (उमेद), उस्मानाबाद
यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित ऑनलाईन
महिला शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून अटारी, पुणेचे संचालक डॉ लाखन सिंग हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्कलकोट (जि.सोलापूर) येथील प्रियदर्शनी महिला सहायता समुहाच्या संचालिका श्रीमती वनीता तंबाके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, मसला खुर्दच्या सौ. शैलजा नरवडे, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक प्रा.लालासाहेब देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा डॉ.लाखनसिंग म्हणाले की, स्त्री शिक्षणाकरिता सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये महान कार्य केले आहे, त्याच्या कार्यापासुन प्रेरणा घेऊन आज शेतकरी महिलां कार्य करावे. बचत गटातील महिलांनी गुणवत्तापुर्ण निर्यातक्षम मालाचे उत्पादन करावे.
श्रीमती वनीता तंबाके आपल्या मनोगतात म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःला कमी न समजता बचत गटाच्या माध्यमातून विविध पदार्थांचे, वस्तूचे उत्पादन करून पुणे, मुंबईसारख्या मोठया शहरांतील बाजारपेठ काबीज करावी. श्रीमती तंबाके यांनी सुरू केलेल्या बचत गटाच्या चढणघडीनीबाबत सांगतांना म्हणाल्या की, त्यांनी बचत गटाची सुरूवात आजपासून 23 वर्षापूर्वी फक्त 100 रुपयांपासून केली आणि आज त्यांच्या विविध उत्पादनांची विक्री महाराष्ट्रासह भारतभर विविध प्रदर्शनांमधून केली जाते. सध्या शेतमाल प्रक्रिया उद्योगाला भरपूर वाव असल्याचे त्या म्हणाल्या. श्रीमती प्रांजल शिंदे म्हणाल्या की, सावित्रीबाईने त्या काळात लढा दिल्यामुळे आज आपण हा दिवस बघू शकतोय. तसेच बालविवाह थांबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक प्रा. लालासाहेब देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी केले तर आभार डॉ बलवीर मुंडे यांनी मानले. सदरील मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार जाधव, डॉ भगवान आरबाड, गणेश मंडलिक, अपेक्षा कसबे, डॉ श्रीकृष्ण झगडे, सखाराम मस्के, डॉ नकुल हरवाडीकर, शिवराज रूपनर, विजय माने आदींनी परिश्रम घेतले. ऑनलाईन मेळाव्यात चारशे पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदविला.