Thursday, January 6, 2022

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्ड पुरस्कृत दोन दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे दि.४ व ५ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. व्हि. बी. कांबळे, कृषि सारथी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री नारायण जराड, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ.डी.बी.देवसरकर म्हणाले कि, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक-यांनी स्वत:चे बियाणे स्वत:च तयार करावेफक्त शेती न करता शेतीवर आधारीत इतर पुरक व्यवसाय करावेत जेणेकरून आर्थिक स्‍थैर्य मिळेल. मार्गदर्शनात डॉ.जी.डी.गडदे म्हणाले कि, विद्यापीठातर्फे नविन विकसीत वाण शेतक-यांनी आपल्या शेतीत पेरावेत जेणेकरून अधिक उत्पन्न मिळवता येईल. तसेच शेतक-यांनी प्रशिक्षणात माहिती घेतलेल्‍या कृषि तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी. यावेळी श्री.जराड यांनी त्यांच्या संस्थेमार्फत घेण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती शेतक-यांना दिली. 

प्रशिक्षणाकरिता जालना जिल्‍हयातील मौजे वरूड येथील २७ शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मागणीनुसार हरभरा व गहू उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन, रबी पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन, डाळिंब उत्पादन तंत्रज्ञान, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, डाळींब व द्राक्ष पिकांचे कीड व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व त्यांचे महत्त्व, मधमाशी पालन, शेळीपालन व व्यवस्थापन, मु-हा म्हैसपालन, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती इत्यादी विविध विषयावर व्याख्यान व प्रात्याक्षिकाव्दारे प्रशिक्षण देण्यात आले. शेतक-यांनी चर्चेत विचारलेल्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत यांनी मानले. डॉ.मधुमती कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी हातभार लावला.