आत्मा (कृषि विभाग) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुकत विद्यमाने दिनांक २७ जानेवारी रोजी मौजे खेर्डा (ता.पाथरी) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ. नंदाताई रामचंद्र आमले हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच श्री विष्णुप्रसाद सिताफळे उपस्थित होते, पाथरी तालूका कृषि अधिकारी श्री. व्हि.टि.शिंदे, मंडळ कृषि अधिकारी श्री.व्हि.एस.नांदे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी श्री.जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ चंद्रकांत लटपटे म्हणाले की, रेशीम शेतीत योग्य नियोजन केल्यास वार्षिक एकरी तीन ते चार लाखाचे उत्पन्न मिळविणे शक्य असुन इतर कोणत्याही पिकातुन एवढे उत्पन्न शक्य नाही. यासाठी मुख्यत: हेक्टरी वीस टन कुजलेले शेणखत, ५ टन गांडुळ खत, ठिंबक सिंचन व्यवस्था, तसेच ८२ बाय २३ बाय १५ फुट आकाराचे कच्चे शेडनेट आदींची आवश्यकता लागेल. शेतकरी बांधवानी रेशीम उद्योगाकडे वळावे, असा सल्ला त्यांनी दिला. तर श्री. व्हि. एस. शिंदे शेतकरी गटाच्या माध्यमातुन मनरेगा योजना व नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत तुती लागवडीकरिता असलेल्या अनुदानाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्हि.एस. नांदे यांनी केले. सुत्रसंचालन श्री.व्हि.व्हि. दलाल यांनी केले तर आभार वरिष्ट संशोधन सहाय्यक श्री.धनंजय मोहोड यांनी मानले. कार्यक्रमास पन्नास पेक्षा जास्त शेतकरी बांधव उपस्थित होते.