Friday, October 3, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" उत्साहात साजरे

 स्वच्छतेची शपथ घेऊन परिसर कचरामुक्त ठेवण्याची सर्वांनी जबाबदारी स्वीकारली



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर २4 सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे उपस्थित होत्या. त्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. यावेळी प्लास्टिक निर्मूलन, कागदाचा अपव्यय टाळणे, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याच्या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. नीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन परिसर कचरामुक्त ठेवण्यासह पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.

यानंतर २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी केले. त्यांनी २ ऑक्टोबर दिवसाचे थोर व्यक्तिमत्वांच्या जयंती सोबतच दसरा व धम्म परिवर्तन दिन म्हणूनही महत्त्व असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या स्वच्छतेचा संदेश अवलंबण्यासह परिसरासह मनही स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थिनी श्रद्धा अंभोरे यांनी महात्मा गांधींच्या कार्याचे वाचन केले, तर रेणुका लोखंडे यांनी लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या कार्याचे वाचन सादर केले. यानिमित्त महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला आणि "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे कक्ष अधिकारी श्रीमती सारिका हवालदार, नर्सरी मदतनीस श्री रमेश शिंदे, कार्यालयीन कर्मचारी श्री माणिक गिरी व श्री रामेश शिंदे यांच्यासह ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. शंकर गणपत पुरी यांनी केले.

महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविण्याचा उद्देश ठेवला असून, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाचे प्रभावी पद्धतीने पालन करण्यास प्रोत्साहन दिले.