भारत सरकारच्या "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२५
अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. दिनांक २४
सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहूल रामटेके
यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन
कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा
उद्देश,
कार्यपद्धती
तसेच समाजसेवेत विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची
सुरुवात एन.एस.एस. गीताने झाली. प्रा. विवेकानंद भोसले यांनी विद्यार्थ्यांना शपथ
दिली. विद्यार्थ्यांनी देशाची प्रगती साधण्याची, स्वच्छतेची जबाबदारी
पाळण्याची,
अन्याय
व भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची तसेच पर्यावरण संवर्धन करण्याची शपथ घेतली.
दिनांक ३० सप्टेंबर रोजी “करिअरचा मार्ग – विकसित भारतात
तरुणांची भूमिका २०४७” या विषयावर डॉ. महेश पाटील यांचे
मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी व
रा.से.यो समन्वयक डॉ. राजेश कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महात्मा गांधी जयंती व माजी
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी
करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राहूल रामटेके होते. त्यांनी
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि
स्वच्छतेवरील माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की स्वच्छता ही फक्त घर
किंवा परिसराची नाही, तर
मनाची, शिक्षणाची
आणि समाजाचीही असावी, तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री
यांची “जय जवान, जय किसान” ही घोषणा
विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांनी देशसेवा, कष्ट आणि निष्ठेचे
महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. संदीप पायाळ तसेच विद्यार्थी यशराज जाधव, वैभव दळवी, कमलकीशोर राजमोद, गणेश बोरडे, आरती शिंदे, आर्या चोपडे व
मृदिता इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय
परिसरात स्वच्छता केली.
कार्यक्रमास डॉ. मदन पेंडके, डॉ. मधुकर मोरे, डॉ. रवींद्र
शिंदे,
इंजी.
लक्ष्मीकांत राऊतमारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी गोरे व शिवाणी डोईजड
या विद्यार्थिनींनी केले. आभारप्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मंचक डोबे, प्रमोद राठोड
आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची
जबाबदारी,
समाजसेवेची
जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व वृद्धिंगत झाले.
.jpeg)