माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची विशेष मोहीम
सप्टेंबर महिन्यात मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे
शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर
सध्याच्या पीक परिस्थितीत शेतकऱ्यांनी अवलंबावयाच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना
तसेच येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी देण्याची मोहीम
राबविण्यात येत आहे. ही मोहीम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत विद्यापीठातील विविध
संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी
महाविद्यालयांच्या मार्फत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली
राबविण्यात
येत आहे.
त्यानुसार आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्णा तालुक्यातील
गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धानोरा काळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर
विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.राकेश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली केळी
संशोधन केंद्र, नांदेडचे प्रभारी अधिकारी तथा उद्यानविद्या तज्ज्ञ
डॉ. शिवाजी शिंदे, बायोमिक्स
उत्पादन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांच्या
चमूने भेट दिली.
यावेळी परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनच्या
शेतावर भेट दिली असता डॉ. राकेश अहिरे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केले. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता
पेरणीस घाई न करता, शेतातील पाण्याचा पूर्ण निचरा झाल्यानंतर
आणि शेत वाफसा स्थितीत आल्यावर एक कोळपणी करावी. त्यानंतर बियाण्याची बीज
प्रक्रिया करूनच हरभऱ्यासारख्या पिकांची पेरणी करावी, जेणेकरून
पीक चांगले उभे राहील व खरीपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई काही
प्रमाणात रब्बी पिकाद्वारे होऊ शकेल.त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धीर देत सांगितले
की विद्यापीठ या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तसेच शेतीच्या
प्रत्येक बाबतीत व येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता विद्यापीठ तांत्रिक सहाय्य देईल,
असे आश्वासनही त्यांनी दिले.
उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, सध्याच्या अतिवृष्टीमुळे हळदीसारख्या पिकांमध्ये पिवळेपणा दिसून येत आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जमिनीतील पाण्याचा त्वरित निचरा करावा.
त्यानंतर प्रति एकर 25 किलो युरिया आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीतून द्यावे, ज्यामुळे
पिकाचा पिवळेपणा कमी होईल, वाढ सुधारेल आणि उत्पादनात वाढ
होईल. फळबागेमध्येही जर पाणी साठलेले असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढावे. तसेच
योग्य बुरशीनाशकाची फवारणी करून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले. याशिवाय,
हळदीच्या पिकात वाफसा आल्यावर माती चढवून वेळेत भरणी करून घ्यावी,
असा सल्लाही त्यांनी दिला.
वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मार्गदर्शन
करताना सांगितले की, तुरीसारख्या पिकामध्ये फायटोप्थेरा
या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास तुरीमध्ये ट्रायकोडर्माची आळवणी करावी.
तसेच हळदी पिकामध्ये पानावरील ठिपके, करपा व कंदकुज या
बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने योग्य
वेळी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. पानावरील ठिपके व करपा नियंत्रणासाठी एजोक्सिस्ट्रोबीन
18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित
बुरशीनाशक) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी
यामध्ये स्टिकर मिसळून फवारणी करावी. तसेच हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक
उपाय म्हणून प्रति एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा
शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साचलेल्या अतिरिक्त
पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा, जेणेकरून कंदकुज होण्यास
कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
कीटकशास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत यांनी हळदीवरील कंदमाशीचा प्रौढ कीटक ज्या ठिकाणी कंद उघडे पडतात
त्या ठिकाणी अंडी घालतो. या अंड्यांतून निघालेली अळी कंद पोखरायला सुरुवात करते, ज्यामुळे
कंदकुजसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन झाडे पिवळी पडतात. त्यामुळे उघडे पडलेले
कंद वेळोवेळी मातीने झाकून ठेवावेत. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50%
हे कीटकनाशक महिन्यातून एकदा 500 मिली प्रति
एकर या प्रमाणात आळवणी करावी. तसेच क्विनालफॉस 25% किंवा
डायमिथोएट 30% या कीटकनाशकांची आलटून-पालटून दर 15 दिवसांनी स्टिकर मिसळून फवारणी करावी. या प्रक्षेत्र भेटीत धानोरा
शिवारातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी सक्रिय
सहभाग नोंदविला.