Wednesday, October 29, 2025

“कृषितरंग – २०२५” : युवक कलागुणांना व्यासपीठ देणारा वनामकृवित भव्य सोहळा संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन उद्घाटन

माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह परदेशी व अभिनेता माननीय श्री. अनिल मोरे यांची प्रेरणादायी उपस्थिती



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी “कृषितरंग – २०२५या उपक्रमाचे भव्य आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषि महाविद्यालय सभागृहात करण्यात आले.

या सोहळ्यासाठी अध्यक्ष व उद्घाटक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमास, जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), तसेच माजी सनदी अधिकारी व प्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय श्री. अनिल मोरे, अस्थी रोग तज्ज्ञ डॉ केदार खटिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार (ऑनलाईन), तर व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, सांस्कृतिक कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून आपली गुणवत्ता, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण अधिक प्रभावीपणे प्रदर्शित करावेत, असे आवाहन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, युवक महोत्सव हे प्रत्येक तरुणाच्या करिअरचे प्रवेशद्वार आहे.
माननीय राज्यपाल महोदयांच्या महत्त्वाकांक्षी “इंद्रधनुष्यया महाविद्यालयीन स्पर्धेसाठी आज या विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड होणार असल्याने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, युवक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची ओळख व जाण निर्माण होते, तसेच तिच्या वृद्धीसही हातभार लागतो. दुर्गम भागातही समाज आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहे, हे आपल्या अभिमानाचे लक्षण आहे. यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवावेत, स्वतःतील गुण ओळखावेत व त्यांचा विकास करावा. अशा युवक महोत्सवातूनच भविष्यातील नामांकित कलाकार घडतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल निष्ठा बाळगावी, सातत्याने प्रयत्न करावेत, आणि आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी. विद्यार्थ्यांकडे उत्तम आचार-विचार, विविध कलांचा जोश व ऊर्जा असावी. तरुणाई जपावी, परंतु कोणत्याही गैरमार्गाला बळी पडू नये.

मोबाईलसह इतर गॅझेटचा सदुपयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम आत्मसात करावेत. स्वछंदी व्हावे, चांगल्या सवयी, वाचनाची आवड जोपासावी, आणि समाजाशी नाते घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच त्यांनी सांगितले की, निराश न होता सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनाकडे पाहावे. सगळं काही संपलं आहे” असे न समजता, तेथूनच नवी सुरुवात करावी. आपल्या गरजा कमी ठेवाव्यात आणि उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करावा, असा उपयुक्त सल्लाही त्यांनी दिला.

शेवटी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘सुगरणीचा खोपा’ या कवितेचा उल्लेख करून, कोणत्याही लोभाला बळी न पडण्याचा संदेश दिला आणि “इंद्रधनुष्यस्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी होऊन मोठे कलाकार बनावेत, अशा शुभेच्छा दिल्या.

माननीय श्री. अनिल मोरे यांनी प्रत्येकाने स्वतःची शक्ती आणि गुण ओळखून आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्वतःच्या जीवनातील उदाहरण देऊन स्पष्ट केले. पुढे त्यांनी या विद्यापीठाच्या विशालतेचे वर्णन करताना त्यांनी नमूद केले की, या विद्यापीठाशी घटक आणि संलग्न ५९ महाविद्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मुलींची वाढती संख्या पाहून त्यांच्या कृषि शिक्षणातील रुची आणि प्रगतीचे विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, आपली संस्कृती जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. माणसे जोडण्याची आणि नाती जोपासण्याची आवड प्रत्येकामध्ये असावी. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देताना त्यांनी म्हटले की, जीवन हा एक उत्सव आहे, आणि ज्याला याची जाणीव झाली तोच खरा कलाकार ठरतो. तोच आपल्या व्यवसायात आणि जीवनात यशस्वी होतो. तसेच जे काही करायचे आहे ते शंभर टक्के समर्पणाने, झोकून देऊन आणि सर्वोच्च दर्जाने करावे. साक्षरता आपण सर्व मिळवतो, परंतु जीवन साक्षरता प्रत्येकाने विकसित करणे गरजेचे आहे. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व देण्याचे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. शेवटी त्यांनी आवाहन केले की, स्वतःच्या मनासारखे जगायचे असेल तर स्वकर्तृत्वावरच जगता येते. त्यासाठी शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणूनच आपल्या ज्ञानाची आणि शिक्षणाची भूक सतत वाढवत राहा.

याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनीही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण डॉ. प्रविण वैद्य यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होते आणि त्यातून ते भविष्यात उत्कृष्ट नागरिक बनतात, असे सांगून त्यांनी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले.

प्रस्ताविकात डॉ. राजेश कदम यांनी भारत हा युवकांचा देश असून, त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी युवक महोत्सवाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित “इंद्रधनुष्य – २०२५-२६” या २१ व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवासाठी विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची निवड होणार असून, त्यातून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, तर आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमात १७ महाविद्यालयांतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध कलागुण सादर केले. परीक्षकांनी या सादरीकरणांचे परीक्षण करून “इंद्रधनुष्य” स्पर्धेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड सुचवली.