Wednesday, October 15, 2025

वाई (ता. कळमनुरी) येथे शेतकरी बांधवांशी आत्मीय संवाद साधत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे उत्स्फूर्त स्वागत

वनामकृविद्वारा आदिवासी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक व बायोमिक्स वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि संशोधन केंद्र, बदनापूर (जि. जालना) यांच्या अखिल भारतीय संबंधित संशोधन प्रकल्प (रब्बी पिके–हरभरा) तर्फे आदिवासी उपयोजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाई गावातील अनुसूचित जमातीतील १०० शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक, जिवाणू आणि बायोमिक्स यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनापरभणी चना-१६’, ‘फुले विक्रम’, ‘आकाश’ आणि ‘बीडीएनजी -७९८या हरभरा जातींची उच्च प्रतीची बियाणे देण्यात आली. तसेच हळद पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी बायोमिक्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त आनंदात आणि अतिशय आपुलकीने स्वागत केले. माननीय कुलगुरूंनीही समाजातील ज्येष्ठ तसेच तरुण बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, गरजा आणि आकांक्षा जाणून घेतल्या. विद्यापीठ तुमच्याच विकासासाठी कार्यरत आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्वतःला समाजाचा एक घटक मानून आत्मीयतेने हितगुज साधले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे कार्य केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत वाणांची पोच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत होणे, हा आमचा ध्येयधोरणाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सक्रिय सहभागाने लाभ घ्यावा, आपल्या गावात आधुनिक शेती तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून उत्पादनक्षमता वाढवावी आणि लाभदायी तसेच टिकाऊ शेती प्रणालीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि सहकार्य यांच्या बळावर प्रत्येक गाव ‘स्मार्ट गाव’ बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी एकत्रितपणे साकार करावे, असे आवाहन करत माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान स्वीकारून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.

यावेळी गावातील सरपंच सौ. मीरा विलास मस्के, सहयोगी अधिष्ठाता तथा प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. टी. जाधव, कृषि विद्यापीठाचे डॉ. गजानन गडदे, तालुका कृषि अधिकारी के. एम. जाधव, संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. पी. एल. सोनटक्के, डॉ. एन. आर. पतंगे, आणि डॉ. व्ही. एन. गीते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी “हरभरा व तुर पिकांवरील व्यवस्थापन” या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यात शास्त्रज्ञांनी बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, तसेच कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे वाई गावातील शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभरा लागवडीबाबत नवीन तंत्रज्ञानाची जाणीव निर्माण झाली असून, उत्पादनक्षमता वाढीसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.