डॉ. जया बंगाळे यांच्या कार्याचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून गौरव – सेवाभाव, संयम व सकारात्मक दृष्टिकोन अनुकरणीय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी विद्यापीठातील ३८
वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी
सेवानिवृत्ती झाल्या . त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यापीठात आयोजित गौरव
सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र प्रदान करून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता
डॉ. जया बंगाळे तसेच त्यांचे पती श्री. रवींद्र बंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. जया
बंगाळे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केली . त्यांनी आजवर विद्यापीठाच्या सर्व
जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने पार पाडल्या असून, त्यांचा निर्धार
सदैव ठाम राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी
यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महाविद्यालयास त्यांची उणीव भासू देऊ नये,
असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. बंगाळे यांनी आपले कार्य
नेहमी आदरयुक्त व सकारात्मक दृष्टिकोनातून केले. त्यांचा हसरा व प्रफुल्लित मोठा
परिवार दिसून येतो. निवृत्तीनंतर त्या निश्चितच या परिवारात व्यस्त राहतील,
अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रुजू
होतानाच त्याचा निवृत्ती दिनांक ठरतो, परंतु दरम्यानच्या
काळात केलेल्या कार्याला महत्त्व असते. आपल्या कार्यामुळे कार्यालयासह कुटुंबातही
शांती व समाधान निर्माण झाले पाहिजे. आपण भाग्यवान आहात की दोन्ही ठिकाणी आपल्याला
प्रेम लाभले. याचे श्रेय आपल्या तपस्या, कार्यभाव , शांत व संयमी स्वभावाला जाते. समाजातील कोणत्याही नकारात्मक बाबीचा परिणाम
त्यांनी आपल्या कार्यावर होऊ दिला नाही, हे गुण सर्वांनी
आत्मसात करण्यासारखे आहेत, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय हेच आहे. समाजाचे
आनंदी, उत्साही व उत्कृष्ट जीवनमान घडवणे हे या
महाविद्यालयाचे ध्येय आहे. महाविद्यालयाच्या प्रायोगिक प्राथमिक शाळेचे कार्य
राष्ट्रीय पातळीवर सतत गौरवले जाते. हे सर्व कार्य डॉ. बंगाळे यांच्या
निवृत्तीनंतरही उर्वरित अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने पुढे न्यावेत,
असे त्यांनी सांगितले.अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास पुढील आयुष्यासाठी
आरोग्य, यश, मित्रपरिवार व आनंद लाभो,
अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या रूपाने
सदैव जिवंत राहतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुकरण करावे, असे त्यांनी नमूद केले. तसेच ते म्हणाले की, सदैव कार्यमग्न राहिलेल्या
व्यक्तींना निवृत्ती नंतरचा काळ हा कठीण जातो .मात्र, डॉ.
बंगाळे यांना लेखन, काव्य , कला,
संगीत व सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यातून समाजाला व परिवाराला
नक्कीच लाभ होईल. जीवनात आनंद हाच सर्वश्रेष्ठ असल्याने प्रत्येकाने आनंदी
राहण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
डॉ. जया बंगाळे यांनी सत्काराला उत्तर देताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी या महाविद्यालयास नेहमीच महत्व दिल्याचे सांगितले. त्यांची
प्रेरणा आणि संदेश प्रशासकीय कार्य करण्यासाठी लाभदायक ठरले असे सांगून त्यांचे
आणि विद्यापीठ प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह
माजी कुलगुरू महोदय डॉ. अशोक ढवण, माजी संशोधन संचालक डॉ
दत्तप्रसाद वासकर, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके,
डॉ. धर्मराज गोखले यांचेही त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबाबत व
सहकार्याबाबत विशेष आभार मानले.
पुढे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात
जुन्या आठवणींना उजाळा देत वरिष्ठ प्राध्यापक, अधिकारी यांच्या
प्रति आदर व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या गोड आठवणी सांगितल्या . त्यांचेच अनुकरण
करून उच्च शिक्षण प्राप्त केले, व हे सर्वजण माझ्यासाठी खरे
रोल मॉडेल होते असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासकीय कार्यासह पूर्व
प्रायोगिक प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि समाज कार्यात रस घेऊन
कार्य केले.
गृह विज्ञान आणि सामुदायिक विज्ञान एकच पदवी असल्याबाबतचा शासन निर्णय
मिळवण्यास महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे भाग्य लाभले. महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक आणि अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. याबद्दल प्रत्येकाची नाव
घेऊन त्यांनी दिलेल्या सहकार्याची पावती त्यांनी यावेळी दिली आणि सर्वांचे आभार
मानले. या प्रसंगी विद्यापीठातील डॉ. गोदावरी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत
डॉ. बंगाळे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या डॉ. विजया पवार, डॉ. वीणा भालेराव,
डॉ. शंकर पुरी, पूर्व प्रायोगिक प्राथमिक
शाळेच्या शिक्षिका श्रीमती श्रुती आंबेकर, रेणुका म्हस्के,
विद्यार्थिनी अपूर्वा लांडगे तसेच डॉ बंगाळे यांच्या परिवारातील सदस्यांनी आपल्या
आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी करून आभार मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक अधिकारी आणि विद्यार्थी हे
बहुसंख्येने सहभागी झाले.