Friday, October 31, 2025

क्रीडा ही शारीरिकच नव्हे तर मानसिक सबलीकरणाचेही प्रभावी माध्यम – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन

वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि अन्नतंत्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस (मुली) या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रविण वैद्य, माजी विभागप्रमुख डॉ. विजया नलावडे आणि माजी क्रीडा शिक्षक डॉ. गुळभिले आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, क्रीडा म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर ती मानसिक सबलीकरण आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना वाढवावी.

उद्घाटक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बॅडमिंटनसारखा खेळ एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. क्रीडेमुळे विद्यार्थिनींमध्ये नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास गाडे यांनी केले. या स्पर्धांमध्ये एकूण २० महाविद्यालयांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. दिवसभर परिसरात खेळाडूंच्या जयघोषाने आणि स्पर्धात्मक वातावरणाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड आगामी स्वारातीम विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सवासाठी करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. गोदावरी पवार,  डॉ. भारत आगरकर यांच्यासह विविध महाविद्यालयांची प्रतिनिधी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले.