उद्यानविद्या पदवी ही करिअर घडविणारी आणि समाज विकासाला दिशा देणारी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीतच्या उद्यानविद्या महाविद्यालयात शैक्षणिक
वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम व पालक
मेळावा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५, रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक
म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख अथिती शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रमुख मार्गदर्शक परभणी येथील पोलिस निरीक्षक श्री. दीपक
दंतुलवार हे होते तर, प्राध्यापक व प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ
खंदारे, शिक्षण प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे, व प्रभारी अधिकारी
डॉ. डी. डी. टेकाळे आदींची मंचावर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उद्यानविद्या
पदवी ही केवळ एक शैक्षणिक पदवी नसून उत्कृष्ट करिअर घडविणारी आणि समाजाच्या सर्वांगीण
विकासाला दिशा देणारी पदवी असल्याचे स्पष्ट केले. या पदवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
देश-विदेशात संशोधन, उद्योगधंदे, व्यवसाय व स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांत
अपार संधी उपलब्ध होतात, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना
मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले. त्यांनी पुढे बोलताना सध्याच्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे
मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात विद्यापीठ पूर्ण मनापासून सामील
असल्याचे नमूद केले. “शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच
खरी विद्यापीठाची ताकद आहे” असे सांगून, विद्यापीठातील शास्त्रज्ञ
प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित
केले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी म्हटले की – “आजच्या
परिस्थितीत तुम्हीच उद्याचे तज्ज्ञ, संशोधक आणि शेतकऱ्यांचे
मार्गदर्शक होणार आहात. त्यामुळे आपल्या पालकांना धीर द्या, अनावश्यक
खर्च टाळा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या सह
पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहा.” शेवटी, विद्यार्थ्यांनी
केवळ ज्ञान संपादन न करता ते प्रत्यक्षात उतरवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी,
समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे,
असे आवाहन करत त्यांनी आपले विचार प्रभावी शब्दांत मांडले.
यावेळी डॉ. भगवान आसेवार यांनी उद्यानविद्या पदवीचे महत्त्व अधोरेखित करताना
सांगितले की, या शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी त्यांना
मोठ्या संधी उपलब्ध असून उज्ज्वल भविष्य त्यांच्या वाट्याला येईल. त्यांनी विद्यार्थ्यांचे
मनोबल उंचावले.
प्रास्ताविकात डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा
अहवाल सादर केला. प्रमुख मार्गदर्शक श्री. दीपक दंतुलवार यांनी उद्यानविद्या क्षेत्रातील
नोकरी व व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. आनंद दौंडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमाची रचना
व शैक्षणिक नियमावली यांचे सविस्तर विवेचन केले. डॉ. सुबोध खंडागळे यांनी दीक्षारंभ
कार्यक्रमांतर्गत पुढील दोन आठवड्यांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
पालक प्रतिनिधी म्हणून श्री. माणिकराव रासवे यांनी प्रतिक्रिया दिल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. वैशाली भगत,
डॉ. सचिन पव्हणे, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, सौ. शमा पठाण, सौ. लोंढे, श्री. एजाज शेख, श्री.
अभिजीत देशमुख, श्री. सतीश पुंड, श्री.
दत्ता मुकाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.
अंशुल लोहकरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लाभला.