Thursday, October 2, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जैन इरिगेशनमध्ये सामंजस्य करार — सूक्ष्म सिंचन व कृषि संशोधनाला नवी दिशा

कृषि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी आणि ज्ञान यांचा समन्वय अत्यावश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषि संशोधन, कृषि विस्तार आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याकरिता सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या करारावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षरी केली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, जैन इरिगेशन उद्योग समूहाने देशभरात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या समूहाने कृषि संशोधन व विस्तार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषि क्षेत्राचा विकास पाणी आणि ज्ञान या दोन्हींच्या समन्वयानेच शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधक यांच्यातील देवाण-घेवाण वाढून कृषि तंत्रज्ञानाच्या संशोधनास चालना मिळेल. दोन्ही संस्थांच्या सहकार्याने सूक्ष्म सिंचन, ऊती संवर्धन, नर्सरी विकास, बीजोत्पादन इत्यादी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करता येईल. तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या सहकार्याने विद्यापीठ नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करणार असल्याचे प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले. याशिवाय दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतीतील तंत्रज्ञान प्रसार व प्रचारासाठी विविध विस्तार शिक्षण कार्यक्रम राबविण्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी डॉ. अनिल ढाके यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सहकार्याने केळी व ऊस या पिकांच्या नवीन जाती विकसित करण्याबरोबरच ठिबक सिंचन पद्धतीबाबत संशोधन करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बालकृष्ण, पाणी व्यवस्थापन योजनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, डॉ. विशाल इंगळे, श्री. ऋषिकेश औंढेकर आणि श्री. भास्कर सुरनर आदी उपस्थित होते.

तदनंतर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या प्रतिनिधींनी विद्यापीठातील बायोमिक्स युनिट, ऊती संवर्धन प्रकल्प, सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे भेटी देऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची पाहणी केली व चालू उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले.