Wednesday, December 23, 2015

कोणत्‍याही संस्‍थेची प्रगती संस्‍थेत कार्य करणा-या व्‍यक्‍तींच्‍या कार्यामुळे होते........कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

विद्यापीठाच्‍या वतीने कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांना निरोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांची बदली कृषि आयुक्‍तालय, पुणे झाली असुन दिनांक २२ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्‍या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नुतन कुलसचिव श्री दिलीप कछवे, विद्यापीठ नियंत्रक अप्‍पासाहेब चाटे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कोणत्‍याही संस्‍थेची प्रगती ही संस्‍थेत कार्य करणा-या व्‍यक्‍तींमुळे होत असते, डॉ दिनकर जाधव यांनी कुलसचिव या नात्‍यानी विद्यापीठ प्रशासक म्‍हणुन प्रशासनात पारदर्शकता आणली. डॉ जाधव मुळे विद्यापीठ प्रशासनात गतीमानता येऊन विद्यापीठ प्रशासनास मानवी चेहरा दिला. त्‍यांच्‍याच काळात विद्यापीठाचा विसावा पदवीप्रदान समारंभ, विविध पदाच्‍या भरती, कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नती, सेवाजेष्‍ठता यादी आदी कार्य यशस्‍वीरित्‍या पारपाडले तसेच त्‍यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार कार्यातही मोलाचे योगदान दिले. 
कुलसचिव डॉ दिनकर जाधव सत्‍काराला उत्‍तर देतांना म्हणाले की, ज्‍या विद्यापीठात शिकलो त्‍याच विद्यापीठाची सेवा करण्‍याची संधी मिळाली, हे भाग्‍य सर्वांनाच मिळत नाही. गेली सोळा महिने विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न सोडविण्‍याचे प्रामाणिक प्रयत्‍न केला. कुलगुरूच्‍या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्‍या सहकार्यांनी विद्यापीठात यशस्‍वीरित्‍या कार्य करू शकलो.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, नुतन कुलसचिव श्री दिलीप कछवे आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. नुतन कुलसचिव उपजिल्‍हाधिकारी श्री दिलीप कच्‍छवे यांनी दिनांक २२ डिसेंबर रोजी विद्यापीठ कुलसचिवपदाचा कार्यभार स्‍वीकारला, कार्यक्रमात नुतन कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात विद्यापीठातील विविध कर्मचारी व विद्यार्थी संघटनाच्‍या वतीने डॉ दिनकर जाधव यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डि जी मोरे यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्‍थित होते. 

Saturday, December 19, 2015

देशास अन्नसुरक्षेसह अन्न पोषण सुरक्षेची गरज....केंद्रीय अन्न तंत्रज्ञान व संशोधन संस्थाचे संचालक मा. प्रा. राम राजशेखरन

वनामकृवित अखिल भारतीय अन्नशास्त्र ज्ञ व तंत्रज्ञच्‍या चौव्वीसाव्या परिषदेचे उद्घाटन
वनामकृवित अखिल भारतीय अन्नशास्त्र ज्ञ व तंत्रज्ञच्‍या चौव्वीसाव्या परिषदेचे उद्घाटन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, मा प्रा राम राजशेखरन, मा. श्री शंतनु भडकमकर, डॉ अशोक ढवण, प्रा. प्रतापकुमार शेट्टी, प्रा सुधीर वालदे, प्रा पी एन सत्‍वधर, प्रा दिलीप मोरे आदी. 
कृषि अन्‍न प्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना परभणीचे खासदार मा श्री संजय जाधव व इतर
वनामकृवित अखिल भारतीय अन्नशास्त्र ज्ञ व तंत्रज्ञच्‍या चौव्वीसाव्या परिषदेच्‍या स्‍मरणिकेचे विमोचन करतांना मान्‍यवर
देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला परंतु कुपोषणाचा प्रश्‍न आजही आहे, मनुष्‍याच्‍या चांगल्‍या आरोग्‍यसाठी अन्‍न पोषण सुरक्षेची गरज असुन शेतक-यांसह अन्‍न शास्‍त्रज्ञ व अन्‍न प्रक्रिया उद्योग आदींना कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन म्‍हैसुर येथील केंद्रीय अन्‍न तंत्रज्ञान व संशोधन संस्‍थाचे संचालक मा. प्रा. राम राजशेखरन यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालय व म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे (फीस्‍ट २०१५) आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक १८ डिसेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन मुंबई येथील महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्री अॅन्‍ड अॅग्रीकल्‍चरचे अध्‍यक्ष मा श्री शंतनु भडकमकर, म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाचे अध्‍यक्ष डॉ प्रतापकुमार शेट्टी यांची उपस्थिती होती. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रा सुधीर वालदेप्राचार्य प्रा. पी. एन. सत्‍वधर, प्रा. दिलीप मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.    
संचालक मा. प्रा. राम राजशेखरन पुढे म्‍हणाले की, देशात भाजीपाला व फळाचे उत्‍पादन मोठया प्रमाणात होत असुन खाद्यतेलात आजही आपण पिछाडीवर आहोत. देशातील शेतकरी हाच अन्‍न प्रक्रिया प्रणालीतील प्राथमिक उत्‍पादक असुन एक महत्‍वाचा दुवा आहे, शेतक-यांच्‍या आर्थिक विकासाकरिता त्‍यांच्‍यातील उद्योजकतेला प्रोत्‍साहन देणे गरजेचे आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, देश अन्‍नधान्‍य उत्‍पादनात स्‍वयंपुर्ण झाला, परंतु अन्‍नधान्‍याची नासाडीचे प्रमाण मोठे आहे. त्‍यासाठी अन्‍न प्रक्रिया उद्योगाचा विकास होणे गरजेचे आहे. देशातील कुपोषणामुळे ३० टक्के बालकांच्‍या शारिरीक विकासावर परिणाम होतो, अन्‍न सुरक्षेसह अन्‍न पोषण सुरक्षा महत्‍वाची आहे. सकस आहारासाठी सकस अन्‍नधान्‍य पिकवावे लागेल, त्‍यासाठी शेतक-यांची उत्‍पादक म्‍हणुन महत्‍वाची भुमिका राहणार आहे. देशात संतुलित आहार निर्मितीसाठी अन्‍नशास्‍त्रज्ञांनी प्रयत्‍नशील असावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
मुंबई येथील महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्री अॅन्‍ड अॅग्रीकल्‍चरचे अध्‍यक्ष मा श्री शंतनु भडकमकर म्‍हणाले की, संपुर्ण जग भारताच्‍या विकासाकडे पाहत असुन देशाच्‍या विकासात शेतक-यांचा महत्‍वाचा वाटा आहे. दोन दिवस चालणा-या परिषदेतील शिफारसींचा उपयोग धोरणकर्त्‍यांना होणार आहे. अन्‍न प्रक्रिया उद्योजगताच्‍या शेतक-यांकडुन कोणत्‍या प्रकारच्‍या शेतमालाची अपेक्षा आहेत हे या प्रकारच्‍या परिषदेमुळे पुढे येतील, अशी अपेक्षा डॉ प्रतापकुमार शेट्टी यांनी व्‍यक्‍त केली. शेतमाल मुल्‍यवर्धनाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे सक्षमीकरण शक्‍य असल्‍याचे शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी सांगितले तर प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर यांनी परिषदेचे महत्‍व विषद केले.
   कार्यक्रमाचे प्रास्‍‍ताविक प्रा दिलीप मोरे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ स्मिता खोडके यांनी तर आभार प्रदर्शन उद्योजक श्री महंमद गौस यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारणी परिषदेचे सदस्‍य मा श्री रविंद्र देशमुख, मा श्री गोंविदराव देशमुख, मा डॉ पी आर शिवपुजे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव आदीसह प्रगतशील शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी, शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सदरिल परिषदेचे म्‍हैसुर केंद्रिय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्‍था व डिफेन्‍स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक असुन यानिमित्‍ताने दिनांक १८ ते २० डिसेंबर दरम्‍यान आयोजित अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे उद्घाटन परभणीचे खासदार मा. संजय जाधव यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळाचे पदाधिकारी प्रा डि डि वाडीकर, श्री बी बी बोरसे, आशुतोष इनामदार, श्री साखरे यांचे सहकार्य लाभेल. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मंडळाच्‍या वतीने आत्‍महत्‍याग्रस्‍त शेतक-यांसाठी कार्य करणा-या नाम प्रतिष्‍ठानला एक्कावन हजार रूपयाचा धनादेश प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख यांना सुपूर्द करण्‍यात आला व उद्योजक शेतक-यांचा सत्‍कारही मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. मंडळाच्‍या वतीने देणात येणा-या युवा अन्‍नशास्‍त्रज्ञ व अन्‍नशास्‍त्रातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थींना पारितोषिके वितरित करण्‍यात आले. परिषदेच्‍या तांत्रिक सत्रात देशातील दीडशे पेक्षा जास्‍त अन्‍न शास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ सहभागी होणार असुन ते अन्‍नशास्‍त्र व तंत्रज्ञान विषयावर विचारमंथन करणार आहेत. 
मार्गदर्शन करतांना मा प्रा राम राजशेखरन
अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

Thursday, December 17, 2015

Wednesday, December 16, 2015

वनामकृविच्या कुलसचिव यांचे श्री. नागोराव सखाराम पांचाळ बाबतचे निवेदन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कुशल व अकुशल कर्मचा-यांच्‍या कायमस्‍वरूपी पदावर नियुक्‍ती देण्‍याची प्रक्रिया अंतिम टप्पयात असुन अद्याप कुठल्याही कर्मचा-यास नियुक्‍ती आदेश देण्‍यात आलेले नाहीत. श्री. नागोराव सखाराम पांचाळ यांना द्यावयाच्‍या नियुक्‍तीच्‍या प्रक्रियेपासुन वगळण्‍यात आलेले नाही. तसेच श्री. पांचाळ यांचे नाव जेष्‍ठता सुची मध्‍ये पुर्वीपासुनच आहे, त्‍यामुळे जेष्‍ठता सुचीमध्‍ये नाव टाकण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. श्री. पांचाळ यांना कुलसचिव कार्यालयाने याबाबत यापुर्वीच सर्व माहिती दिलेली आहे. श्री. पांचाळ यांना विद्यापीठाच्‍या कुठल्याही अधिकारी व कर्मचा-यांनी पैसे मागितले नाहीत. तथापि त्‍यांनी १४ डिसेंबर २०१५ पासुन त्‍यांच्‍या वर झालेल्‍या कथित अन्‍यायाविरूध्‍द विद्यापीठ गेट समोर उपोषण सुरू केले होते. प्रशासनाने त्‍याच्‍या उपोषणाची दखल घेऊन उपोषणापासुन परावृत्त्व्‍हावे असे श्री. पांचाळ यांना कळविले होते, परंतु दिनांक १५ डिसेंबर २०१५ रोजी श्री. पांचाळ यांनी विद्यापीठास कोणतीही पुर्व सुचना न देता आत्‍मदहनाचा ततायीपणा केलेला आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव यांनी निवेदनाव्‍दारे कळविले आहे.

वनामकृवित आयोजित अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे १८ डिसेंबर रोजी उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालय व म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे (फीस्‍ट २०१५) आयोजन करण्‍यात आले असुन म्‍हैसुर केंद्रिय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्‍था (सिएफटीआरआय) व डिफेन्‍स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक आहे. सदरिल परिषदेचे उद्घाटन दिनांक १८ डिसेंबर रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात सकाळी ९.०० वाजता होणार असुन परभणी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष मा श्री राजेश विटेकर व मुंबई येथील महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्‍ट्री अॅन्‍ड अॅग्रीकल्‍चरचे अध्‍यक्ष मा श्री शंतनु भडकमकर हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन लाभणार आहेत. प्रमुख अतिथी म्‍हणुन म्‍हैसुर येथील केंद्रीय अन्‍न तांत्रिक व संशोधन संस्‍थाचे संचालक प्रा राम राजशेखरन यांची उपस्थिती लाभणार असुन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. यानिमित्‍ताने दिनांक १८ व २० डिसेंबर दरम्‍यान आयोजित अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचेही उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते होणार आहे. दोन दिवस चालणा-या परिषदेच्‍या तांत्रिक सत्रात देशातील दीडशे पेक्षा जास्‍त अन्‍न शास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ उपस्थित राहुन अन्‍नशास्‍त्र व तंत्रज्ञान यावरील नाविन्‍यपुर्ण संकल्‍पनेवर आपले विचार मांडणार आहेत. तरी सदरिल उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन आयोजक तथा प्राचार्य प्रा पा नि सत्‍वधर, प्रा दिलीप मोरे व श्री महंमद गौस यांनी केले आहे.

Saturday, December 12, 2015

वनामकृवित कृषि व अन्‍नप्रक्रिया प्रदर्शनीचे आयोजन

शेतक-यांत उद्योजकता विकासासाठी अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेत आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालय व म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे (फीस्‍ट २०१५) आयोजन करण्‍यात आले असुन शेतक-यांचे कृषि प्रक्रिया व शाश्‍वत तंत्रज्ञानाव्‍दारे सक्षमीकरण याविषयावर आधारीत या परिषदेचे म्‍हैसुर केंद्रिय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्‍था (सिएफटीआरआय) व डिफेन्‍स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक आहे. परिषदेच्‍या निमित्‍ताने महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक १८ व २० डिसेंबर दरम्‍यान अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाच्‍या परिसरात करण्‍यात आले असुन यात शंभर पेक्षा अधिक दालनांचा समावेश राहणार आहे. यात कृषि अन्‍न प्रक्रिया व मुल्‍यवर्धित पदार्थ निर्मीतीत राज्‍यातील नामवंत उद्योग नासिक येथील नामधारी फ्रेश, लातुर येथील बेकरी उद्योग चाकोते फुड प्रोडक्टस, कृषि व अन्‍नप्रक्रियात उद्योग उभारणीस प्रसिध्‍द असलेले सातारा येथील थ्री पी सोलुशनस, कृषिमाल आयात-निर्यातीसाठी आवश्‍यक असणारी विविध प्रक्रिया, कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अन्‍नसुरक्षा संकरप्रणाली आदींबाबत मार्गदर्शन करणारी कंपनी पनवेल येथील सेफ फुडस सोल्‍युशनस, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग मे. झेन नॅचरल अॅग्रो प्रा लिमिटेड, जनहार, मोती नमकीन, शिवम् मसाले आदीच्‍या दालनांचा समावेश राहणार आहे.    अशा प्रकारचे प्रदर्शनाचे आयोजन प्रथम परभणीत होते असुन सर्व शेतकरी बांधव, ग्रामीण महिला, बचत गटाच्‍या महिला, उद्योजक, युवकांना व नागरिकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजक प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्रा दिलीप मोरे व संयोजक श्री महंम्‍मद गौस यांनी केले आहे.
  कृषि उत्‍पादित माल हा नाशवंत व हंगामी स्‍वरूपाचा असल्‍यामुळे त्‍याची उपलब्धता विशिष्‍ट काळात होत असते, काढणी तंत्रज्ञानाचा अभाव व प्रक्रिया व साठवणुकिच्‍या अपु-या सोयीमुळे उत्‍पादित कृषि मालांची मोठया प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान, हे दुष्‍टचक्र थांबवण्‍यासाठी शेतक-यांनीच आपल्‍या उत्‍पादित मालावर प्रक्रिया करून त्‍यापासुन मुल्‍यवर्धीत व प्रक्रियायुक्‍त अन्‍नपदार्थाच्‍या निर्मीती केली तर शेतक-यांना अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो. विशेषत: मराठवाडयातील शेतीला कृषि पुरक जोडधंद्याशिवाय गत्‍यंतर नसुन अन्‍नप्रक्रिया उद्योगाची कास शेतक-यांना धरावी लागणार आहे. शेतक-यांत उद्योजकता विकास चालना मिळावी, हा उद्देश ठेऊन या अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामुळे अन्‍नप्रक्रियाबाबतचे नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानाची शेतक-यांना ओळख होणार आहे. या प्रदर्शनीत अन्‍नप्रक्रिया, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचा व विपणन व्‍यवस्‍था यावर अधिक भर राहणार आहे.

Friday, December 11, 2015

वनामकृवि व भाभा अनुसंशोधन केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांची भुईभुग बीजोत्‍पादन प्रक्षेत्रास भेट

जिंतुर तालुक्‍यातील मौजे केहाळ येथील कृषिभुषण श्री मधुकररा घुगे यांच्‍या शेतास भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले, विस्तार कृषि विद्यावेता डॉ. यु एन आळसे, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी. एस. चव्हाण तसेच मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्राचे डॉ. . एम. बडीगन्नावार, डॉ. अभिजीत शीत्र, बीजप्रमाणीकरण अधिकारी श्री सुदामराव घुगे यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी रोजी जिंतुर तालुक्‍यातील मौजे केहाळ येथील कृषिभुषण श्री मधुकरराव घुगे यांच्‍या शेतावरील बीजोत्‍पादन प्रक्षेत्रास भेट देवून रब्बी भुईमुग, तुर, गहु, कापुस आदी पिकांची पाहणी केली.
  यावर्षी प्रतिकुल परिस्थितीतही विद्यापीठ विकसित एमएयुएस-७१ या सोयाबीनचे हेक्टरी २५ क्विंटल उत्पन्न घेवून श्री घुगे यांनी उच्चांक गाठला आहे. वि द्यापीठ विकसित बदनापूर-७११ या तुरीचा वाण सध्या काढणीस तयार असुन अंदाजे २५ ते ३० क्विंटल हेक्टरी उत्पन्न येवू शकते, असे त्यांनी सांगितले. भारतीय काजू म्हणून नावालौकीक असलेला भुईमुगाचा वाण टिएलजी-४५ याची काढणी झाली असून हेक्टरी ६० ते ७० क्वींटल उत्पन्न येईल असा अंदाज आहे. रबी भुईमुगाचे वाण टिजी-५१ व टिअेजी-३७ या वाणाचेही चांगले उत्पन्न येईल, अशी आशा श्री घुगे यांनी व्‍यक्‍त केली. वातावरणातील बदलामुळे शरबती गव्हाचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत असले तरी श्री घुगे यांनी भाभा अनुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने एचडी-१०९८ हा डायकोकम (खपली /जोडगहु) वाणापासुन गतवर्षी हेक्‍टरी ४५ क्विंटलाचे उत्पन्न काढले असुन यावर्षी थंडी कमी असली तरीही हे पीक चांगले आहे, हेक्‍टरी ५५-६० क्विंटलाचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे. गेल्‍या १६ वर्षापासुन कुषीभुषण श्री मधुकर घुगे भुईमुग पीक घेत असुन भुईमुग पिकामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आहे, शेती क्षेत्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र पातळीवरचा "कृषि भुषण" पुरस्कार प्राप्त केला आहे. श्री घुगे विद्यापीठाचा प्रत्येक संशोधीत वाण आपल्या शेतावर प्राधान्याने घेतात तर वनामकृविचे शास्त्रज्ञ नेहमीच त्‍यांना मार्गदर्शन करतात.
  या प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले यांनी भुईमुग, तुर व कापुस आदी पिकांवर येणा-या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबदद्ल महत्वाच्या सुचना श्री घुगे यांना दिल्या. सतत भुईमुगावर भुईमुग घेतल्यामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असुन जमिनीतून एकाच भागातून अन्नद्रव्य पीक घेत असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे, त्याकरिता पिकांची फेरपालट करण्याचा सल्ला डॉ यु एन आळसे यांनी दिला. वातावरणातील बदल, मजूरांची कमतरता, निविष्ठांची महागाई, डुकरांसहित वन्यप्राण्यांचा त्रास, पाणी टंचाई व इतर बाबींवर मात करीत श्री घुगे यांनी एकत्रित जवळपास दोनशे एकर शेतीचे सुयोग्‍य व्यवस्थापन अगदी सहजतेने केले आहे. डॉ. भोसले, डॉ. आळसे व प्रा. चव्हाण यांनी संपूर्ण शेतीला भेट देवून चांगल्या व्यवस्थापनाचे कौतूक केले.