Friday, September 5, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा

 विविध स्पर्धांमधून बौद्धिक विकास साधवा... शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सव २०२५ निमित्त विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते दिनांक ४ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरतेच ज्ञान मर्यादित न ठेवता विविध स्पर्धांमधून बौद्धिक विकास साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा स्पर्धा समितीचे अध्यक्ष डॉ. विक्रम घोळवे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद सोनकांबळे, सचिव डॉ. धीरज पाथ्रीकर, सदस्य डॉ. स्वाती झाडे, डॉ. मेघा जगताप, डॉ. नरेंद्र कांबळे तसेच गणेशोत्सव आयोजन समितीतील सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेत शेती, विज्ञान, इतिहास, साहित्य, चालू घडामोडी अशा विविध विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढीस लागून त्यांची स्पर्धात्मक तयारी अधिक बळकट झाली.