Sunday, September 7, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राज्य पात्रता परीक्षेत (SET-2025) यशस्वी ठसा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिनांक १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) मध्ये गृह विज्ञान (होम सायन्स) विषयात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, गृह विज्ञान विषयातून एकूण ६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक व व्यावसायिक कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी विद्यार्थ्यामध्ये दिव्या उत्तम भगत, प्रतिक्षा तुकाराम गवाले, गायत्री बालमुकुंद  काबरा, अदिनाथ मुरलीधर बेले ,जान्हवी रंगऱाव उक्कलगावकर आणि ज्ञानेश्वरी रामराव अरगडे  हे विद्यार्थी पात्र ठरले असून या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण प्राप्त करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सेट परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यापैकी चार विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण याच शैक्षणिक वर्षात पूर्ण केले आहे, तर दोघांनी पदवीचे शिक्षण येथे पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण बाहेरील विद्यापीठातून अंतिम टप्प्यात आहे. या यशामुळे या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्याची पात्रता मिळाली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, विभाग प्रमुख तथा शिक्षण कक्ष प्रमुख डॉ. वीणा भालेराव, तसेच विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कष्ट, सातत्यपूर्ण परिश्रम व जिद्दीचे कौतुक केले.