Wednesday, September 3, 2025

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात गणेशोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर

 ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून "रक्तदान हेच महादान" या संदेशाला जाग दिली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सव २०२५ निमित्त विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय, कृषि महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना आणि गणेशोत्सव आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. विशेष उपस्थितीमध्ये कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तसेच शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांची उपस्थिती लाभली.

रक्तदान शिबिरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. जिल्हा रुग्णालय, परभणी येथील डॉ. सुभाष सिशोदिया आणि त्यांच्या कुशल टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. मेघा जगताप यांचे तसेच विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीपाद गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले.

विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिराच्या प्रारंभी मार्गदर्शनपर व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदानाचे वैज्ञानिक महत्त्व, आरोग्यदायी फायदे आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला असून, यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून "रक्तदान हेच महादान" या संदेशाला जाग दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव, परस्पर सहकार्याची भावना आणि मानवतेची कळकळ वृद्धिंगत झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रक्तदान शिबिराने महाविद्यालयात समाजहिताचा आणि सेवाभावाचा संदेश दिला.