Tuesday, September 9, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात साजरा - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी साधला संवाद

 

भारताचे माजी राष्ट्रपती, प्रख्यात तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा "शिक्षक दिन" वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ९ सप्टेंबर रोजी परभणी येथील कृषी महाविद्यालय सभागृहात विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधला. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत आदींची उपस्थिती होती.

यावेळी माननीय कुलगुरूंनी सांगितले की, शिक्षक हे केवळ ज्ञानदाते नसून समाज घडविणारे दिशादर्शक दीपस्तंभ आहेत. शिक्षक राष्ट्रनिर्मितीचे कार्य करतात. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, ते नक्कीच राष्ट्राच्या प्रगतीसाठी अनमोल योगदान देणार आहेत. शिक्षणातूनच सर्व व्यवसायांचा उगम होतो, म्हणूनच शिक्षकांचे महत्त्व अतुलनीय आहे.

समाजात काही औपचारिक तर काही अनौपचारिक शिक्षक असतात. आपण केवळ औपचारिक शिक्षणावर अवलंबून न राहता अनौपचारिक शिक्षणातूनही ज्ञान संपादन केले पाहिजे. दैनंदिन जीवनातील अनुभव हेच आपले सर्वात मोठे शिक्षक असतात. तसेच आई-वडील, कुटुंब, मित्र-परिवार यांच्याकडूनही आपण मौल्यवान जीवनशिक्षण घेतो.

शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी उदाहरण दिले की, "पृथ्वीचा कागद, जंगलातील झाडांचे पेन आणि पाण्याची शाई करून अभ्यास केला तरी शिक्षकांनी दिलेले ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ असते." शिक्षक हा कुंभारासारखा असतो, जो कच्च्या मातीच्या गाडग्याला योग्य आकार देतो; त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना बालवयापासून व्यावसायिक अभ्यासक्रमापर्यंत घडवतो.

यानिमित्ताने "शिक्षक दिन" का साजरा केला जातो, याविषयी सांगताना माननीय कुलगुरूंनी नमूद केले की, भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्यभर भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासत शिक्षकी पेशा निष्ठेने चालविला. त्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली तसेच त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण व कृषी विकासाचे तत्त्व शैक्षणिक उपक्रमांमध्ये समाविष्ट केले. त्यांचे जीवनकार्य अद्वितीय असल्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त "शिक्षक दिन" साजरा केला जातो.

माननीय कुलगुरूंनी पुढे शिक्षकांचे गुण विशद करताना सांगितले की, शिक्षकांकडे विषयाचे सखोल व अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सतत नवनवीन कौशल्ये आत्मसात करून काळानुरूप अध्यापन पद्धतीत बदल घडवून आणले पाहिजेत. शिक्षकांकडे उत्कृष्ट संवादकौशल्य, संयम, ऐकण्याची क्षमता आणि विद्यार्थ्यांना सत्य व योग्य ज्ञान देण्याची वृत्ती असावी.

विद्यार्थ्यांच्या स्वभावाशी समरस होण्याची ताकद शिक्षकांमध्ये असावी. विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना ठेवून वर्गात मोकळा संवाद व हलकेफुलके वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन द्यावे, स्वतःची निराशा त्यांच्यावर काढू नये. गरज भासल्यास शिस्तीचे भान योग्य पद्धतीने देणेही शिक्षकांचे कर्तव्य आहे.

शेवटी, माननीय कुलगुरूंनी स्पष्ट केले की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांचा सकारात्मक विकास घडवावा आणि त्यांना चारित्र्यसंपन्न, जबाबदार व सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे हीच खरी शिक्षकांची जबाबदारी आहे.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात त्यांनी “गुरु” म्हणून अनेक सकारात्मक बाबी अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या असून, त्याचा परिणाम म्हणून विद्यापीठाने अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान अनमोल आहे. विद्यार्थी व शिक्षक यांचे संबंध हे दीर्घकालीन असतात, त्यामुळे ते अधिकाधिक दृढ ठेवणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व प्रेमाची भावना ठेवावी, तसेच आवश्यकतेनुसार शिस्त लावून चांगले विद्यार्थी घडवावेत. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या ज्ञानाचा कितपत लाभ होतो, हे पाहणेही शिक्षकांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रीकर व डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर आभार कृषी महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रणजीत चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षक दिनाचा उत्सव संस्मरणीय केला.