Friday, September 12, 2025

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थ्यांना नेटाफिम इरिगेशन कंपनीत औद्योगिक प्रशिक्षणाची संधी

 प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहावे.... शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी विभागात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषि औद्योगिक सलंग्नता उपक्रमासाठी नेटाफिम इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

या अनुषंगाने विभाग व नेटाफिम इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि औद्योगिक सलंग्नता उपक्रमाचे अध्यक्ष व विभागप्रमुख (कृषि अभियांत्रिकी) डॉ. आर. जी. भाग्यवंत, तसेच महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना सिंचन विषयाचे सखोल मार्गदर्शन केले व भावी जीवनात या प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठीची अधिकृत पत्रे त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान स्वयंशिस्त, वेळेचे काटेकोर पालन, संघभावना तसेच व्यावसायिक नैतिकतेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रशिक्षणासाठी विद्यापीठ रावे मुख्य समन्वयक व विभागप्रमुख डॉ. राजेश कदम यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नेटाफिम इरिगेशन कंपनीचे डॉ. सागर खोडके व प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. अमित वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी केली. यावेळी डॉ. रणजीत चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मकरंद भोगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष फुलारी यांनी मानले.