Saturday, February 13, 2016

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने वेळीच व्युुहरचना आखण्याचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांचे आवाहन

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात कपाशीवरील शेंदरी बोंडअळी : नवीन आव्‍हान या विषयावरील कार्यशाळा संपन्न

कापुस हे मराठवाडयातील मुख्‍य नगदी पिक असुन या वर्षी बी टी कपाशीवर डिसेंबर महीन्‍यातच शेंदरी बोंडअळीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. पुढील हंगामात याचा मोठया प्रमाणात उद्रेक होण्‍याचा शक्‍यता लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात दिनांक १० फेब्रुवारी रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी : नवीन आव्‍हान या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले तर नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि विभागाचे संचालक (निविष्‍ठा व गुणनियंत्रण) श्री जयंत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत सुरत, खंडवा, गुंटुर, आदिलाबाद, मुधोळ, राहुरी व अकोला येथील कापुस शास्‍त्रज्ञ, कृषि विद्यापीठातील कृषि विस्‍तार शास्‍त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.
   उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील शेतक-यांची अर्थव्‍यवस्‍था ही मोठया प्रमाणात कापुस या पिकावर अवलंबुन असुन या वर्षीच्‍या हंगामात बी टी कपाशीवर शेंदरी बोंडअळी प्रादुर्भाव आढळुन आला. राज्‍यात पुढील वर्षी या बोंडअळीचा उद्रेक होऊ नये म्हणुन वेळीच उपाय योजना करणे आवश्‍यक असुन हंगामापुर्वी कृषी अधिकारी व शेतकरी यांचे व्‍यापक प्रशिक्षण घेऊन कापुस लागवड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान व वेळेवर आवश्यक उचित नियंत्रणाचे उपाय करणे अगत्‍याचे आहे. या अळीचे क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत सर्वेक्षण करण्‍यात येऊन प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने वेळीच व्‍युहरचना आखण्‍याचे कुलगुरूनी आवाहन केले.  नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मागील हंगामात कापुस अधिक काळपर्यंत शेतामध्‍ये ठेवणे, अधिक कालावधीचा वाणांची लागवड, बिगर बी टी आश्रयात्‍मक ओळी न लावणे, बी टी कपाशीचे बीजोत्‍पादन घेतांना एकच बी टी युक्‍त जनक वाण वापरणे, नत्रयुक्‍त खताचा अतिरेकी वापर, विविध किटकनाशके एकत्र मिसळुन फवारणी करणे आदी शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होण्‍याची कारणे आहेत. त्‍यांनी शेंदरी बोंडअळीसाठी व्‍यवस्‍थापनासाठी उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले.   शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव राज्‍यात वाढु नये म्‍हणुन गावपातळीवर शेतक-यांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील, असे प्रतिपादन श्री जयंत देशमुख यांनी केले. प्रास्‍ताविकात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी कार्यशाळा आयोजनाची भुमिका सांगुन नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे चालु वर्ष हे अमृत महोत्‍सवी वर्ष असुन संशोधन केंद्राच्‍या प्रमुख उपलब्‍धी मांडल्‍या. कार्यशाळेत कापुस विशेषज्ञ डॉ के एस बेग यांनी बी टी कपाशीवर चालु वर्षात डिसेंबर महिन्‍यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षणीय असल्‍याचे सांगितले. किटकशास्‍त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ पी आर झंवर यांनी शेंदरी बोंडअळीच्‍या जीवनक्रमाबाबत माहिती दिली.  कार्यशाळेत विविध राज्‍यातील सहभागी शास्‍त्रज्ञांनी त्‍या त्‍या राज्‍यातील बोंडअळीच्‍या प्रादुर्भावाबाबत मते मांडतांना सांगितले की, बोंडअळीमध्‍ये बी टी प्रथिनाविरूध्‍द प्रतिकारक्षमता निर्माण झाली असुन त्‍यामुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मागील दोन हंगामातुन गुजरातमध्‍ये झालेला प्रादुर्भावाच्‍या अनुभवावरून पुढील वर्षी महाराष्‍ट्र व अन्‍य राज्‍यात शेंदरी बोंडअळीचा उद्रेक होऊ नये म्‍हणुन लागवडीपुर्वी उपाययोजना करणे व सामुहिक प्रयत्‍न करणे आवश्‍यक असल्‍याचे चर्चेतुन समोर आले. तसेच या अळीचा प्रादुर्भाव न वाढण्‍यासाठी अल्‍पकालावधीच्‍या वाणांची गरज असल्‍याचे मत शास्‍त्रज्ञांनी व्‍यक्‍त केले. कार्यशाळेत मराठवाडयातील विविध जिल्‍हयातुन आलेल्‍या प्रगतशील शेतक-यांनीही बोंडअळीबाबतची आपले विचार व अनुभव मांडले.
   कार्यशाळेचे सुत्रसंचलन प्रा अरविंद पांडागळे यांनी तर आभार डॉ शिवाजी तेलंग यांनी केले. याप्रसंगी नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रातील नाविन्‍यपुर्ण प्रयोगशाळेची माहिती प्रा अरूण गायकवाड व डॉ पवन ढोके यांनी उपस्थितांना दिली. कार्यशाळेस विद्यापीठातील उपसंचालक संशोधन डॉ जी के लोंढे, डॉ ए एस जाधव, डॉ एस बी पवार, प्रा अरूण गुट्टे आदीसह शेतकरी व  शास्‍त्रज्ञ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्‍यवस्‍थापन घडीपत्रिकेचे विमोचन करतांना कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ केशव क्रांती, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, संचालक श्री जयंत देशमुख आदी

Thursday, February 11, 2016

मेक इन इंडिया मध्ये कृषि तंत्रज्ञानास मोठा वाव ........... माननीय राज्यपाल तथा कुलपती मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव

वनामकृवि राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियानाची माननीय राज्‍यपालांनी केली पाहणी
मार्गदर्शन करतांना माननीय राज्यपाल  तथा कुलपती मा  मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव
कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना
मार्गदर्शन करतांना माननीय राज्यपाल  तथा कुलपती मा  मा श्री चेन्नमेननी विद्यासागर राव
वनामकृविच्या उमेद कार्यक्रमावर आधारीत प्रदर्शीनी दालनाची पाहणी करतांना
स्वच्छ भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवितांना

देशातील शेती क्षेत्र हे एक महत्‍वाचे क्षेत्र असुन आजही शेती हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे. पन्‍नास टक्‍के पेक्षा जास्‍त लोकसंख्‍या शेतीवर अवलंबुन आहे. सध्‍याचा काळ शेती क्षेत्रासाठी संक्रमणाचा काळ आहे. वातावरणातील बदल, सततचा दुष्‍काळ, वाढत चाललेले शहरीकरण हे राज्‍यातील शेती पुढील मुख्‍य संकटे आहेत. गत तीन वर्षापासुन दुष्‍काळ परिस्थितीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हतबल झाला आहे, त्‍यांच्‍यातील नैराश्‍य कमी करण्‍यासाठी विद्यापीठ राबवित असलेला उमेद जागृतीचा उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद आहे, असे प्रतिपादन माननीय राज्‍यपाल तथा कुलपती मा. श्री. चेन्‍नमेननी विद्यासागर राव यांनी केले.
       वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियानाची पाहणी दिनांक ११ फेब्रवारी रोजी माननीय राज्‍यपाल श्री. चेन्‍नमेननी विद्यासागर राव यांनी केली, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. राजेश विटेकर, महापौर मा. श्रीमती संगिता वडकर, खासदार मा. श्री. संजय जाधव, आमदार मा. डॉ. राहुल पाटील, विभागीय आयुक्‍त मा. डॉ. उमाकांत दांगट यांची प्रमुख उपस्थिती होती

   माननीय राज्‍यपाल पुढे म्‍हणाले की, वातावरण बदलास अनुकूल कृषि तंत्रज्ञान विकसीत करण्‍यावर कृषि विद्यापीठाने भर द्यावा. दुष्‍काळ परिस्थितीस तोंड देण्‍यासाठी वाटर बजेट, कुपनलिका व विहीर पुनर्भरण, ठिबक सिंचन, जलसंधारण आदि बाबींवर भर द्यावा लागेल. देशामध्‍ये फळ व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्‍पादन होते परंतु शेतमाल प्रक्रिया व साठवणुक सुविधांच्‍या अभावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यापीठांनी अन्‍नप्रक्रिया, पॅकीजिंग व शेतमालाचे मूल्‍यवर्धन करणारे तंत्रज्ञान विकसीत करावे व या क्षेत्रात कृषि उद्योजक घडवावेत. एका बाजुस मजुरांना रोजगार नाही तर शेतीमध्‍ये मजुरांची कमतरता आहे. अन्‍न सुरक्षा, जल सुरक्षा व उर्जा सुरक्षा या बाबींवर अधिक काम करण्‍याची गरज असुन ग्रामीण जीवनमान उंचवण्‍यासाठी कृषि शास्‍त्रज्ञ, शासन व शेतकरी यांना सामुदायीकरीत्या काम करावे लागेल.
   विद्यापीठ राबवित असलेला स्‍वच्‍छ भारत अभियान कार्यक्रम वाखण्‍याजोगा असुन महाविद्यालयीन युवकांनी यात मोठे योगदान दिले आहे. कृषि पदविधरांना कृषि व्‍यवसायात मोठी संधी असुन भारत सरकार राबवित असलेले स्‍टार्ट अप इंडिया मध्‍ये आपले नाविन्‍यपुर्ण कृषि तंत्रज्ञान व कल्‍पना सादर कराव्‍यात. मेक इन इंडियामध्‍ये कृषि तंत्रज्ञानाचा सुध्‍दा सहभाग होऊ शकतो. कृषि विद्यापीठाकडील नाविन्‍यपुर्ण व शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान मेक इन इंडियामध्‍ये मांडाव्‍यात, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. 

   या प्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष मा. श्री. राजेश विटेकर यांनी परभणी जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात राबवित असलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानाची माहिती दिली तर खासदार मा. श्री संजय जाधव यांनी मराठवाड्याच्‍या कृषि विकासासाठी समन्‍यायी पाणी वाटपाची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू यांनी कृषि विद्यापीठ राबवित असलेल्‍या उमेद व स्‍वच्‍छ भारत अभियान कार्यक्रमाची माहिती दिली. 

   कृषि विद्यापीठ विकसित कृषि तंत्रज्ञानावर व विविध उपक्रमावर आधारीत प्रदर्शनीची पाहणी माननीय राज्‍यापाल यांनी केली. कार्यक्रमात विद्यापीठ विकसित एकात्मिक किड व्‍यवस्‍थापनावरील मोबाईल अॅप चे माननीय राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. विद्यापीठ रा‍बवित असलेल्‍या उमेद कार्यक्रमावर आधारीत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले प्रकाशित पुस्तिकेचे व स्‍वच्‍छ भारत अभियानावर आधारीत प्राचार्य डॉ डि एन गोखले संपादित गंध मातीचा, बंध समाजाचा’  पुस्तिकांचे विमोजन माननीय राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. राष्‍ट्रीय सेवा योजना व राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी राबविलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियानाच्‍या क्षणचित्राची पाहणी माननीय राज्‍यपाल यांनी करून स्‍वच्‍छ भारत अभियानास हिरवा झेंडा दाखविला.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राचार्य विशाला पटणम यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुल रंजन महिवाल, जिल्‍हा पोलीस अधिक्षीका श्रीमती नियती ठाकर, विद्यापीठ कार्यकारीणी परिषदेचे सन्‍माननीय सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, मा. श्री रविंद्र देशमुख, मा. श्री अनंतराव चोंदे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे आदिसह प्रगतशील शेतकरी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्‍यापक, कर्मचारी व‍ विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

विद्यापीठ विकसित कुपनलिका पुनर्भरण मॉडेलची पाहणी करतांना माननीय राज्यपाल
उमेद पुस्तिकेचे विमोचन करतांना
गंध मातीच, बंध समाजाचा पुस्तिकेचे विमोचन करतांना
प्रास्ताविक करतांना कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु
एकात्मिक किड व्यवस्थापनावरील मोबाईल अप चे विमोचन करतांना

Tuesday, February 9, 2016

शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चाचे कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ....... विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले

मौजे धारासुर येथे शेतकरी मेळावा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व तालुका कृषि अधिकारी, गंगाखेड यांच्‍या संयुक्‍त विदयमाने धारासुर ता. गंगाखेड येथे राष्‍ट्रीय कृषि विकास योजना एकात्मिक तंत्रज्ञान प्रसार प्रकल्‍पांतगर्त शेतकरी मेळावा व "उमेद" कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 फेब्रुवारी रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विदयापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती अनिताताई शिंदे या होत्‍या.
उद्घाटनपर भाषणांत बोलतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले म्‍हणाले की, शेतक-यांनी खचून न जाता परिस्थितीशी सामना करावा, शासन व कृषी विदयापीठ आपल्‍या पाठीशी आहे. शेतक-यांनी विद्यापीठाचे कमी खर्चाचे कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याची  शिफारस त्‍यांनी केली.
यावेळी डॉ. यु. एन. आळसे यांनी टंचाई परिस्थितीत पीक व्‍यवस्‍थापन विषयावर तर प्रा. डी. डी. पटाईत यांनी हुमणी व्‍यवस्‍थापनावर पॉवर पांईट व्‍दारे मार्गदर्शन केले. डॉ. अे. टी. शिंदे यांनी चारा व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. कृषि विकास अधिकारी श्री. बी. एस. कच्‍छवे  यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागामार्फत देण्‍यास येणा-या विविध योजनांबदल महिती दिली. जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ. हर्षलाताई कदम यांनी सोयाबीन, कडधान्‍य व इतर धान्‍यांचा आहारात वापर करुन सकस आहार कमी खर्चाने कस करता येईल याबदल विद्यापीठ तज्ञांनी मार्गदर्शन करण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली. बालरोग तज्ञ डॉ.एम.टी.जाधव यांनी शेतकरी आत्‍महत्‍या का होतात? याचे विश्‍लेषण करून शासनाच्‍या शेतक-यांसाठी आरोग्‍यविषयक विविध योजना सांगितल्‍या.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विस्‍तार कृषिविदयावेत्‍ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी श्री. नांदे यांनी केले व सुत्रसंचलन श्री. उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी तालुका कृषि अधिकारी श्री. जी. अे. कोरेवाड, एस. बी. जाधव, अशोक पंडित तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक दगडुदादा जाधव, अच्‍युतराव जाधव, उपसरपंच मधुकर कदम, अनंतराव कदम, अर्जुन जाधव, प्रल्‍हादराव जाधव, दिगंबरराव जाधव, प्रतापराव कदम, अतुलदादा जाधव, दत्‍तात्रय जाधव, सदानंद जाधव, अशोक जाधव, एकनाथराव कदम, नरेंद्र जाधव, रामराव जाधव यांनी परिश्रम घेतले.

शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या थोपवण्‍यासाठी सामुदायीक प्रयत्‍नांची गरज..........अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा

वनामकृवितील कृषि महाविद्यालयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांशी साधला संवाद

आज शेतकरी हतबल झाला आहे, कर्जाच्‍या डोंगराखाली आत्‍महत्‍याकडे रेटला जात आहे, हे थोपवण्‍यासाठी सामुदायीक प्रयत्‍नांची गरज आहे. दुष्‍काळ निर्मुलन आणि शाश्‍वत शेतीचा विकास हा लोकसहभागाशिवाय शक्‍य होणार नाही, यासाठी कृषि पदवीधरांनी योगदान दयावे, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍य दुष्‍काळ निवारण व निर्मुलन मंडळाचे उपाध्‍यक्ष तथा प्रसिध्‍द अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा यांनी केले. शेती-पाणी-रोजगार संवाद यात्रेच्‍या निमित्‍त दिनांक 8 फेब्रुवारी रोजी कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, श्री के. . हरिदाससौ. शंकुतला देसरडा, श्री साथी रामराव जाधव, श्रीराम पाटील, डॉ. बी. आर. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
          अर्थतज्ञ मा. प्रा. एच. एम. देसरडा पुढे म्‍हणाले की, संघटीतपणे गावपातळीवर पाणी आडवा, पाणलोट क्षेत्र विकास, समुचित पिक संयोजन यातुन शाश्‍वत शेती विकास व उत्‍पादन वाढ तसेच नैसर्गीक संकटात सुलभ विमा योजना यामार्गे शेतक-यांना चांगले जीवनमान गाठता येईल. मराठवाड्यात कोरडवाहु शेती उत्‍पादन अत्‍यंत कमी असुन ज्‍वारीसारखी पिके नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन घटत्‍या व साठवलेल्‍या ओलीवर घेणे आवश्‍यक आहे. त्‍याच बरोबर शेतीमध्‍ये कमीत कमी बाह्य निविष्‍ठांचा वापर करुन शाश्‍वत शेती करणे काळाची गरज आहे. शेतीमध्‍ये श्रम करणा-यांना समाजासह कृषि पदवीधरांनी प्रोत्‍साहन देणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य  डॉ. डी. एन. गोखले यांनी केले. सुत्रसंचलन वसतीगृह अधिक्षक डॉ. बाबासाहेब  ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन स्‍पर्धा मंच अध्‍यक्ष श्री कृष्‍ण वारकड यांनी केले.  कार्यक्रमास डॉ. विश्‍वनाथ खंदारे, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश महाजन आदिसह पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होतेसंवाद कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रकाश ठाकरे, बालाजी बोबडे, मधुकर मांडगे आदिसह स्‍पर्धा मंचाच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले.


Saturday, February 6, 2016

मौजे बाभुळगांव येथे शेतकरी शास्‍त्रज्ञ संवाद कार्यक्रम संपन्न

शेतीत विद्यापीठाच्‍या हवामान बदलानारुप नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानामुळे दुष्‍काळाची दाहकता कमी होण्‍यास मदत झाल्‍याची शेतक-यांचे मत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने दि. ३ जानेवारी रोजी हवामान बदलानारुप नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानावर आधारीत राष्‍ट्रीय उपक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांच्‍या थेट संवादाचा कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला होता, यात यशस्‍वी निक्रा योजनेतील शेतक-यांनी आपले मनोगत व अनुभव सांगितले.
हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर विशेष करुन गत दोन वर्षापासुन कमी पाऊस, भुर्गर्भातील खालवलेली पाण्‍याची पातळी, पिक उत्‍पादनातील घट, वैरणीची समस्‍या आदी अनेक समस्‍या शेतक-यांना भेडसवत असुन कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या निक्रा प्रकल्‍पांच्‍या अंतर्गत गेली तीन वर्षे मौजे बाभुळगांव येथे हवामान बदलानुरुप तंत्रज्ञान प्रात्‍यक्षिके शेतक-यांच्‍या शेतावर राबविण्‍यात येत आहेत. यात आंतरपीक पध्‍दती, रुंद वरंबा सरी पध्‍दत, कमी कालावधीचे व पाण्‍याचा ताण सहन करणारे पिकांचे वाण, ठिबक सिंचनाचा वापर, विहिर पुनर्भरण, कुपनलीका पुनर्भरण या माध्‍यमातुन पीक उत्‍पादन शाश्‍वतता आणण्‍यात यश आले तसेच आंतरपीक पध्‍दत, रुंद वरंबा, सरी पध्‍दत आदीमुळे उत्‍पादनात १८ ते २२ टक्‍के वाढ आढळुन आली. याच प्रकल्‍पांतर्गत शेतक-यासाठी अवजारे सुविधा केंद्रही चालवले जात आहे
या संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. आसेवार यांनी सदरिल योजनेची उदिष्‍टे सांगुन भविष्‍यात कमी पाण्‍यावर येणारी पिके जसे कुलथी, मटकी, बाजरी, तुर तसेच एकात्मिक शेती पध्‍दतीचा व शेटनेटचा अवलंब शेतक-यांनी करण्‍याचा सल्‍ला दिला. या संवाद कार्यक्रमात शास्‍त्रज्ञ प्रा. पेंडके एस. एम., डॉ. आनंद गोरे, श्रीमती सारीका नारळे, कृषि अधिकारी कृषि अधिकारी श्री सामाले यांनी शेतक-यांशी संवाद साधला.
यात अनेक शेतक-यांनी तंत्रज्ञान व याेग्‍य नियोजनाने दुष्‍काळी दाहकता कमी होण्‍यास मदत झाल्‍याची प्रतिक्रीया व्‍यक्‍त केली. कमी पाण्‍यावरील पिकाबाबत आपले अनुभव प्रगतशील शेतकरी गिरीष पारधे यांनी सांगितले तर कृषि अवजारे सुविधा केंद्रात बीबीएफ यंत्राची गरज असल्‍याचे मत बालासाहेब मस्‍के यांनी व्‍यक्‍त केले. श्रीमती लक्ष्‍मीबाई, यांनी कांदा पिकासाठी ठिबक सिंचन उपकरणाची गरज असल्‍याचे सांगितले. बाबाराव पारधे यांनी हरभरी व कपाशीत ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेमुळे कमी प्रमाणात मर रोगाची लागण होते असे मत व्‍यक्‍त केले. यावेळी शेतकरी नारायण राऊत यांनी स्‍वखर्चान विहीर पुर्नभरणाचे संयत्र उभारल्‍याबाबत सर्वांनी अभिनंदन केले. ज्ञानेश्‍वर पारधे यांनी शेडनेट मधील मेथी, टोमॅटो, कांदे, चारा पिके घेऊन कमी पाण्‍यात अधिक उत्‍पादन एकात्मिक पिक पध्‍दतीने घेतलेल्‍या प्रक्षेत्रास सर्व शेतक-यांनी भेट दिली. कार्यक्रमास महिला शेतक-यांसह शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री गिरीष पारधे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्ञानोबा पारधे, विठ्ठल पारधे, माणिक समिंद्रे, किरण, सयद, जावेद, भंडारे आदींनी परिश्रम घेतले.

Thursday, February 4, 2016

दुष्काळी परिस्थितीत वनामकृविच्‍या परभणी मोतीने तारले शेतक-याला

मौजे तरोडा येथील शेतक-यांनी केला विद्यापीठाच्‍या तंत्रज्ञानाचा वापर 
परभणी तालुक्‍यातील मौजे तरोडा येथील शेतकरी शे. रहीम शे. नादुमिया यांनी ५ एकर क्षेत्रावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेली परभणी मोती व मालदांडी ज्‍वारीची पेरणी केली आहे. खरीपाची पीके हातची गेल्‍यानंतर हताश न होता शे. रहिम यांनी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राला भेट देऊन ज्‍वार पीक लागवडी विषयी माहिती घेतली असता विस्‍तार कृषि विदयावेत्‍ता डॉ. यु.एन. आळसे यांनी अवर्षण परिस्थितीत तग धरणारी परभणी मोती व तूलनेसाठी मालदांडी ज्‍वारी पेरण्‍याचा सल्‍ला दिला तर किडकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांनी इमिडाक्‍लोप्रिड १४ मिली प्रति किलो बियाण्‍यास बीजप्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. त्‍यामुळे ज्‍वारीला खोडमाशी व हूमणी अळीचा प्रादुर्भाव झाला नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्‍यामुळे जमिनीत ओलावा अत्‍यंत कमी होता. बोअरला पाणी कमी असल्‍यामुळे सरवनी पाणी दिल्यास एकच एकर जमिन भिजली असती. तुषार सिंचन संच नव्‍हता अशा परिस्थितीत डॉ. आळसे यांच्‍या सल्‍यानूसार वखराला दोरी बांधुन मागे जोड सरत्‍याने खत व बियाण्‍याची कोरडयातच पेरणी केली, त्‍यामुळे आपोआपच स-या पडल्‍या. त्‍या स-यामधुन एकसरी आड पाणी दिले. ज्‍वारी उगवण शंभर टक्‍के झाली. दुसरे पाणी पीक पोटरीत असतांना एक सरी आड दिले त्‍यामुळे अशा अवर्षण परिस्थितीतही कमी पाण्‍यात कुठल्‍याही आधुनिक किंवा उच्‍च दाब सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही, तरिही शे. रहिम यांना एकरी परभणी मोती ज्‍वार वाणाचे साधारणत: धान्‍य १० क्विंटल व कडब्‍याच्‍या १ हजार पेंडया पर्यंत उत्‍पादन येऊ शकते, असा त्‍यांचा अंदाज आहे. त्‍यांच्‍या मते आतापर्यंत अशी ज्‍वारी कधीच झाली नाही. दिनांक ३० जानेवारी रोजी डॉ. यु. एन. आळसे व  प्रा. डी. डी. पटाईत यांनी श्री. शेख रहिम यांचे परभणी मोती पीकाला भेट दिला असता, मावा किडींचा प्रादुर्भाव दिसुन आला त्‍यासाठी प्रति १० लिटर पाण्‍यात डायमेथोएट १० मिली व १३:०:४५ विद्राव्‍य खताचा १५० ग्रॅम मिसळुन फवारण्‍याचे सांगितले.

Wednesday, February 3, 2016

बँकॉक (थायलंड) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांना पारितोषिक

बँकॉक (थायलंड) येथे कासेटसार्ट युनिर्व्हसिटी, थायलंड व अकोला येथील असोसिएशन ऑफ प्लांट पॅथोलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २२ जानेवारी दरम्यान वनस्पती रोग शास्त्र विषयाची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उस्‍मानाबाद कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी द्राक्ष पिकावरिल डाऊनी मिल्डयु रोगांवर नविन औषधांची उपयुक्तता या विषयावर सादर केलेल्‍या पोस्टरने व्दितीय क्रमांक पटकाविला. परिषदेच्‍या समारोपीय कार्यक्रमात डॉचंद्रशेखर अंबाडकर यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिक देऊन गौरविण्‍यात आले.