Saturday, June 20, 2020

वनामकृवि विकसित पाच फणी रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) यंत्र सोयाबीन उत्पादकांना ठरणार वरदान ......... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मौजे साळापुरी ये‍थे बीबीएफ यंत्राचे प्रात्‍यक्षिक व मार्गदर्शन

मराठवाडयातील बहुतांश शेती पाऊसावर अवलंबुन आहे, हवामान बदलामुळे पावसाचे आगमनवितरण तसेच निर्गमन यामध्ये बराचसा बदल आढळुन येत असुन याचा परिणाम सोयाबीन उत्‍पादनावर दिसुन येत आहे. पडणा-या पावसाचे जास्तीत जास्त मुलस्थानी जलसंधारण करून त्याचा पावसाच्या खंड काळात उपयोग करणे जसे आवश्यक आहे तसे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणेही आवश्यक आहे. याकरिता परभणी कृषी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र सोयाबीन उत्‍पादकांना निश्चितच वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व पोकरा प्रकल्‍पकृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने परभणी तालुक्‍यातील मौजे साळापुरी येथे शेतक-यांच्‍या शेतात दिनांक 20 जुन रोजी आयोजित रूंद वरंबा व सरी (बीबीएफपध्‍दतीने सोयाबीनची पेरणीचे प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास  विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, कृषि उत्‍पन्‍न बाजार समितीचे सदस्‍य श्री गणेश घाटगे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी, सरपंच श्री सतिश घाटगे, पंचायत समिती सदस्‍य श्री अमोल चव्‍हाण, उपविभागीय कृषी अधिकारी श्री सागर खटकाळेडॉ राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सदरिल बीबीएफ यंत्र शेतक-यांना व्‍यवसायिकदृष्‍टया उपलब्‍ध करण्‍याकरिता विद्यापीठाने पुणे येथील रोहीत कृषि इंडस्ट्रिज सोबत सांमजस्‍य करार केला असुन पुढील काही वर्षात बीबीएफ पध्‍दतीने सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढविण्‍याचे कृषि विभाग व विद्यापीठाचे  उद्दीष्‍ट आहे. शेतकामाच्‍या वेळी मजुरांची कमतरता व वाढती मजुरी यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाची गरज असुन प्रत्‍येक गावात शेती अवजारे भाडेतत्‍वावर देणारे केंद्राची स्‍थापना करावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

बीबीएफ यंत्राबाबत प्रात्‍यक्षिकासह माहिती देतांना कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंळी म्‍हणाल्‍या की, सोयाबीन मध्‍ये तण व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्टीने उगवणपुर्व तणनाशकांचा वापर करणे फायदेशीअसुन या बीबीएफ यंत्राव्‍दारे पेरणी सोबतच तणनाशक फवारता येते. या पध्‍दती मुळे पावसाचे पाणी स-यांमध्ये मुरते, मुलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकासतसेच पुढील हंगामातील पिकांस लाभ होतो. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची वाढ जोमदारपणे होते. या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने टॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे होणारा माती दबण्याचे प्रमाण कमीत कमी होईल.

जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकरी डॉ संतोष आळसे म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध झालेल्‍या बीबीएफ यंत्राने यावर्षी प्रायोगिकतत्‍वावर जिल्‍हयातील पोकरा प्रकल्‍पांतर्गत निवडक गावात शेतक-यांच्‍या शेतावर पेरणी करण्‍यात येणार आहे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास निश्चितच मोठा प्रमाणात शेतक-यांचा फायदा होईल, याकरिता कृषि विभागातील योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.  यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत तर प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी भविष्‍यातील यांत्रिकीकरणाबाबत माहिती दिली.

यावेळी डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी कशी करावी, यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी, व रासणी करण्‍याचे प्रात्‍यक्षिक शेतकरी भागवत घाटगे यांच्‍या पाच एकर शेतावर दाखविले. मौजे साळापुरी येथील काही निवडक शेतक-यांच्‍या साधरणत: 30 एकर जमिनीवर कृषि विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री दिपक नागुरे यांनी केले तर आभार तालुका कृषि अधिकारी श्री पी बी बनसावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी गजानन घाटगे, बाबासाहेब घाटगे, अतुल चव्‍हाण आदीसह कृषि विभाग व कृषि विद्यापीठातील अधिकारी यांनी परिश्रम घेतले.