Thursday, June 11, 2020

एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल ...... मा डॉ अशोक दलवाई

वनामकृवि आयोजित बदलत्‍या हवामानास अनुकुल तंत्रज्ञानावरील ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

प्रशिक्षण वर्गात आस्‍ट्रेलिया, अल्‍जेरिया, नायजेरिया, नेपाळ, मलेशिया, म्‍यानमार आदीसह देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी

देशात व राज्‍यात कोरडवाहु शेतीचे प्रमाण जास्‍त आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याकरिता या कोरडवाहु शेतीचे उत्‍पादन वाढ होणे आवश्‍यक आहे. कोरडवाहु शेतीत बदलत्‍या हवामानास अनुकुल तंत्रज्ञान विकसित करून प्रसाद करणे गरजे आहे. केवळ एक किंवा दोन पिकांवर अवलंबुन न राहता, ए‍कात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब वाढला पाहिजे, असे मत केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे अभ्‍यास समितीचे अध्‍यक्ष मा डॉ अशोक दलवाई यांनी व्‍यक्‍त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेपच्‍या वतीने दिनांक 11 ते 15 जुन दरम्‍यान कोरडवाहु शेतीत हवामान अनूकुल तंत्रज्ञानावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 11 जुन रोजी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक मा डॉ ए के व्‍यास हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन सहभागी  होते तर अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण आयोजक डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, लॉकडाऊनच्‍या काळात परभणी कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शेतकरी, विद्यार्थी, प्राध्‍यापक, कृषि विस्‍तारक व कृषि शास्‍त्रज्ञांच्‍या करिता अनेक ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग आयोजित केली, यामुळे देश व विदेशातील विख्‍यात तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यासर्वांचा फायदा निश्चितच कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणात होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

मा डॉ ए के व्‍यास मार्गदर्शनात म्‍हणाले की, पर्जन्‍यावर आधारित शेतीमध्‍ये पांरपारिक पिक पध्‍दती शिवाय कृषि वन शेती, कोरडवाहु फळपिके, पशुसंवर्धन इतर शेतीपुरक व्‍यवसायावर भर देणे गरजेचे असुन पावसाच्‍या पाण्‍याचा प्रत्‍येक थेंबाचा कार्यक्षमरित्‍या शेतीत वापर करावा लागेल, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी केले तर नाहेप प्रकल्‍पाबाबत डॉ गोपाल शिंदे यांनी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले तर आभार डॉ एम एस पेंडके यांनी मानले. सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात बदलत्‍या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानावरील विविध विषयावर क्रीडा हैद्राबादचे संचालक डॉ जी रविंद्र चारी, धारवाड येथील कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ आर एच पाटील, पोकरा प्रकल्‍पाचे डॉ विजय कोळेकर, बेंगलौर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ मुदलगिरीअप्‍पा,  कौईम्‍बतुर येथील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ सी आर चिन्‍नामुथू, हैद्राबाद क्रीडाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ के ए गोपीनाथ, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एम एस पेंडके, डॉ उदय खोडके, डॉ के व्‍ही राव, सिमोगा ये‍थील डॉ एस श्रीधर आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

सदरिल प्रशिक्षण वर्गात कृषि क्षेत्रातील आस्‍ट्रेलिया, अल्‍जेरिया, नायजेरिया, नेपाळ, मलेशिया, म्‍यानमार  आदीसह देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ स्‍वाती मुंढे, इंजि सचिन कराड, डॉ अनिकेत वाईकर, इंजि अपुर्वा देशमुख आदीचे तांत्रिक सहाय्य लाभले.