Friday, June 5, 2020

शेतीत जैवतंत्रज्ञान आधारे विकसित केलेल्या जैविक किटकनाशकांचा वापर करण्‍याची गरज ...... ऑस्ट्रेलियातील संशोधिका मा डॉ निना मित्तर

वनामकृवित आयोजित जैवतंत्रज्ञानवरील आंतरराष्‍ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन 

प्रशिक्षण वर्गात अमेरिका, कॅनडा,  ऑस्‍ट्रोलिया आदीसह अनेक देशातील कृषि शास्‍त्रज्ञाचा सहभाग    

शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठया प्रमाणात होत आहे, त्‍यास निश्चितच मर्यादा आहेत. रासायनिक किटकनाशकांच्‍या ऐवजी जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेले जैविक किटकनाशकांचा वापर केल्‍यास पर्यावरण संतुलन साधता येईल, असे प्रतिपादन आस्‍ट्रेलिया येथील क्‍वीन्‍सलॅड युनिवर्सिटीच्‍या संचालिका डॉ निना मित्‍तर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) वतीने आधुनिक शेतीतील अद्ययावत डिजिटल व जैवतंत्रज्ञान साधने यावर ऑनलाईन आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 4 ते 8 जुन दरम्‍यान करण्‍यात आले असुन या प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या नाहेप प्रकल्‍पाचे  राष्‍ट्रीय संचालक  मा डॉ आर सी अगरवाल, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण वर्गाचे आयोजक डॉ अच्‍युत भरोसे आदींचा प्रमुख सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गामुळे जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाची माहिती देशातील कृषि संशोधकांना होणार असुन जागतिक दर्जाचे संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल.  

मा डॉ आर सी अगरवाल यांनी नाहेप प्रकल्‍पामुळे जागतिक स्‍तरावरील कृषि संशोधनाबाबत देशातील कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना ज्ञान होऊन, देशातील कृषि संशोधन कार्यास दिशा प्राप्‍त होईल. यावेळी डॉ धर्मराज गोखले यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.  

सदरिल आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षणात अमेरिका, ऑस्‍ट्रोलिया, नेपाळ, अफगाणीस्‍थान, कॅनडा आदीसह देशातील विविध राज्‍यातुन कृषि शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले असुन जैवतंत्रज्ञानाशी निगडीत विविध विषयावर ऑस्‍ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठातील डॉ जार्ल्‍स राबीन, अमेरिकेतील वॉशिंग्‍टन स्‍टेट युनिवर्सिटीचे शास्‍त्रज्ञ डॉ प्रशांत स्‍वामी, मोहाली येथील राष्‍ट्रीय कृषि अन्‍न जैवतंत्रज्ञान संस्‍थेच्‍या डॉ संस्‍कृती, गुजरात येथील जुनागड कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ रूकामसिंग तोमर, पुणे येथील डिएफआर चे डॉ प्रशांत कवर, ऑस्‍ट्रेलियातील वेस्‍टेर्न सिडनी युनिवर्सिटीचे डॉ सचिन चव्‍हाण, पुणे येथील डॉ माधुरी पगारिया,  किन्‍स युनिवर्सिटचे डॉ अमोल घोडके, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे डॉ चिना बाबु नाईक, काश्‍मीर कृषि विद्यापीठातील डॉ साजेद माजिद झरगर आदी मार्गदर्शन करणार आहेत. 

डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन आयोजक डॉ अच्‍युत भरोसे यांनी केले तर आभार डॉ के एम शर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ अनिकेत वाईकर, डॉ स्‍वाती मुंडे, श्री सचिन कराड, श्रीमती अपुर्वा वाईकर आदींनी परिश्रम घेतले.