Wednesday, June 17, 2020

वनामकृविचे माननीय कुलगुरू शेतक-यांच्‍या बांधावर

मौजे सोन्‍ना येथे बीबीएफ तंत्रज्ञानाच्‍या प्रसाराकरिता वनामकृवि व कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यामाने शेतक-यांच्‍या शेतात प्रात्‍यक्षिके



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व पोकरा प्रकल्‍प, कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने परभणी तालुक्‍यातील मौजे सोन्‍ना येथील शेतक-यांच्‍या शेतात रूंद वरंबा व सरी (बीबीएफ) पध्‍दतीने सोयाबीनची पेरणीचे प्रात्‍यक्षिक कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थित दिनांक 17 जुन रोजी घेण्‍यात आले. कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, कृषिविद्यावेत्‍ता डॉ उदय आळसे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री सागर खटकाळे, डॉ संजीव बंटेवाड, तालुका कृषि अधिकारी श्री पी बी बनसावडे, डॉ राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील बहुतांश शेती ही कोरडवाहु असुन सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे. बदलत्‍या हवामानात कधी अधिक पाऊस तर कधी पाऊसाचा मोठा खंड पडतो, यामुळे सोयाबीन उत्‍पादनावर मोठा परिणाम होतो. याकरिता रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने सोयाबीनची पेरणी केली तर अधिकचे पडणारे पाऊसाचे पाणी सरीतुन वाहुन जाते तसेच कमी पाऊसात पडलेले पाणी कार्यक्षमरित्‍या पिकांस उपलब्‍ध होते. परभणी कृषि विद्यापीठाने पाच फणी रूंद सरी वरंबा बी खत पेरणीसह फवारणी व रासणी यंत्र विकसित केले असुन सदरिल यंत्र शेतक-यांना उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने व्‍यावसायिकरित्‍या तयार करण्‍याचे अधिकार पुणे येथील रोहित कृषि इंडस्ट्रिज यांच्‍या सोबत सामंजस्‍य करार करण्‍यात आला आहे. या यंत्राच्‍या सहाय्याने पेरणी, तणनाशक व किडकनाशक फवारणी, रासणी सर्व कामे करणे शक्‍य आहे. येणा-या काळात हे यंत्र सर्वत्र उपलब्‍ध होऊन जास्‍तीत जास्‍त सोयाबीन पेरणी झाल्‍यास निश्चितच शेतक-यांचे सोयाबीन उत्‍पादनात भरीव वाढ होण्‍यास मदत होईल.   

जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकरी डॉ संतोष आळसे म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन उपलब्‍ध झालेल्‍या बीबीएफ यंत्राने यावर्षी प्रायोगिकतत्‍वावर जिल्‍हयातील पोकरा प्रकल्‍पांतर्गत निवडक गावात शेतक-यांच्‍या शेतावर पेरणी करण्‍यात येणार आहे. शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन हे बीबीएफ यंत्र खरेदी केल्‍यास निश्चितच मोठा प्रमाणात शेतक-यांचा फायदा होईल, याकरिता कृषि विभागातील योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

यावेळी विद्यापीठ कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी यांनी विद्यापीठ विकसित पाच फणी रूंद सरी वरंबा बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी कशी करावी, यंत्राने तणनाशक फवारणी, पेरणी, व रासणी करण्‍याचे मार्गदर्शन करून प्रात्‍यक्षिक शेतकरी राम गमे यांच्‍या पाच एकर शेतावर दाखविले. मौजे सोन्‍ना येथील काही निवडक शेतक-यांच्‍या 30 एकर जमिनीवर कृषि विभागाच्‍या मदतीने पेरणी करण्‍यात येणार आहे. प्रात्‍यक्षिक पाहणी करिता गावातील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के एम जाधव यांनी केले तर आभार एम बी बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सर्व तालुका कृषि अधिकारी, दिपक नागुरे, कृष्‍णा पाटिल आदीसह कृषि विभाग व कृषि विद्यापीठातील अधिकारी यांनी परिश्रम घेतले.