Thursday, June 25, 2020

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात कौशल्य विकासावर ऑनलाईन प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत गोळेगांव (हिंगोली) कृषि महाविद्यालय व सिंजेंटा फाउंडेशन, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि क्षेत्रातील ग्रामीण युवकांचा कौशल्य विकासया प्रकल्पांतर्गत कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम सत्रातील विद्यार्थ्‍यांकरिता एक महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन 23 जुन ते 22 जुलै दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक 23 जुन रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्राध्‍यापक डॉ गिरीष जेऊघाले, प्रकल्पाचे अखिल भारतीय प्रमुख श्री. रविंद्र कटरे, सिंजेंटा फाउंडेशन, इंडियाचे प्लेसमेंट अधिकारी श्री. वैभव जगताप आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, सद्यस्थितीत कृषि उद्योगास मोठा वाव आहे, प्रत्‍येक कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना नौकरी मिळेलच असे नाही, त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी कृषि उद्योजक होण्‍याचा पर्याय निवडावा, असा सल्‍ला देऊन लॉकडाउनच्या काळात ऑनलॉईन विद्यार्थ्‍यांना ही चांगली संधी असल्‍याचे सांगितले तसेच सदरिल प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषि उद्योजकतेची बीजे रोवण्‍यास मदत होईल अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. प्रमुख अतिथी डॉ. जेऊघाले यांनी हा स्तुत्य उपक्रम असल्‍याचे सांगितले तर श्री. रविंद्र कटरे यांनी आपल्या मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रकल्पाचे केंद्र प्रमुख श्री. भुषण साठे यांनी केले. प्रशिक्षण यशस्‍वीतेकरिता डॉ. सुनिल उमाटे, प्रा. महेश तनपुरे आदीसह सिंजेंटा फाउंडेशन, इंडिया व महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदरील प्रशिक्षण यशस्वीरित्या पुर्ण केलेल्या विद्यार्थ्‍यांना स्वयंरोजगारासोबतच विविध राष्ट्रीय, बहूराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणाकरिता कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील अंतीम सत्राच्‍या 27 विद्यार्थ्‍यांची निवड करण्‍यात आली आहे.