Tuesday, June 30, 2020

वनामकृवित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व प्रकल्प संचालक आत्मा परभणी यांच्यातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत दिनांक 22 जून ते 26 जून दरम्यान शेतीशाळा प्रशिक्षकांकरिता पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांच्या हस्ते झाले, यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. एस. बी. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री. के. आर. सराफ, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्हणाले, शेतीशाळा प्रशिक्षकांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य वाणाची निवड पासून ते काढणीपर्यंत तांत्रिक माहिती देऊन मार्गदर्शन करावे सदरील प्रशिक्षणाद्वारे उपस्थित सर्व प्रशिक्षकांनी त्यांच्या कृषि विषयक तांत्रिक अडचणींची तंज्ज्ञा मार्फत सोडवणूक करून शेतकऱ्यांना विद्यापीठ तंत्रज्ञानाविषयी अवगत करावे, असा सल्‍ला दिला.
श्री. एस. बी. आळसे यांनी प्रशिक्षकांना पूर्ण ज्ञान घेऊन शेतकऱ्यांच्या समस्येचे शेतावर जाऊन समाधान करावे, जेणेकरून या प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच विद्यापीठाशी वेळोवेळी संपर्कात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, असे सांगितले तर डॉ. पी. आर. देशमुख यांनी विद्यापीठांची कृषि विषयक प्रकाशने व तांत्रिक साहित्य, कृषी दैनंदिनी, याचा वापर प्रशिक्षकांनी शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना करावा असे सांगितले.
विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.यु.एन आळसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्री.के.आर.सराफ प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रशिक्षणाची रूपरेषा यावेळी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विभुते व कु. मोनिका चौदंते यांनी केले.
सदरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यापीठातील विविध तज्ञांनी जमीन निवडीपासून ते लागवडी पर्यंत खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन पासून ते पीक काढणीपर्यंत, शेतकरी निवडीपासून ते निरीक्षणे घेण्यापर्यंत, हवामान बदलापासून ते शेतकऱ्यांशी संवाद कौशल्य साधने या विषयावर तज्ञांनी सविस्तर असे विविध सत्रामध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र तर्फे प्रा. डी.डी. पटाईत, डॉ. मधुमती कुलकर्णी यांनी तर आत्मा परभणी यांच्यातर्फे श्री. विभुते, कु. मोनिका चौदंते,श्री अंबुरे, श्री कदम यांनी साहाय्य केले.  सदरील प्रशिक्षणाद्वारे एकूण 40 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.