Thursday, December 2, 2021

सिंचनाची सोय असल्‍यास उन्‍हाळयात सोयाबीनच्‍या दर्जेदार बियाणाची निर्मिती करता येईल..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि आयोजित ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेत राज्‍यभरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधवाचा सहभाग

मराठवाडा  विभागात सोयाबीन पिकाचे क्षेत्रात मोठी वाढ झाली असुन कपाशी पेक्षा जास्‍त क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होत आहे. गत दोन वर्षापासुन खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढणीच्‍या वेळेस सतत पाऊस पडत असल्‍यामुळे बियाण्‍याची उगवणक्षमता कमी होत आहे. त्‍यामुळे खरीप हंगामात पेरणीच्‍या वेळेस दर्जेदार बियाणाचा तुटवडा निर्माण होतो. त्‍यामुळे ज्‍या शेतक-यांकडे सिंचनाची सोय आहे, असे शेतकरी उन्‍हाळी हंगामात थोडया क्षेत्रावर बीजोत्‍पादन घेऊन घरच्‍या घरी दर्जेदार बियाणे तयार करू शकतात, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संशोधन संचालनालय आणि सोयाबीन संशोधन योजना यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक २ डिसेंबर रोजी ऑनलाईन उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यशाळेच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यशाळेस उदघाटक म्‍हणुन इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे संचालिका मा डॉ निता खांडेकर या उपस्थित होत्‍या तर कार्यक्रमास विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, इंदौर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्‍थेचे माजी संचालक डॉ विरेंद्रसिंह भाटीया, आयोजक सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ शिवाजी म्‍हेत्रे आदींची विशेष उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पूढे म्‍हणाले की, बीजोत्‍पादनाकरिता उन्‍हाळी सोयाबीनची लागवड करतांना  खरिपात ज्‍या जमिनीवर  सोयाबीन  घेतले होते, त्‍या जमिनीवर घेऊ नये, त्‍या ठिकाणी रोग व किडींचा जास्‍त प्रादुर्भाव  होण्‍याची  शक्‍यता  असते. उन्‍हाळी सोयाबीन लागवड करतांना येणा-या समस्‍या खरिप हंगामातील लागवडी पेक्षा वेगळे आहेत, त्‍याची माहिती घेऊन उन्‍हाळी सोयाबीनची लागवड करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बीजोत्‍पादनाकरिता उन्‍हाळी सोयाबीनची लागवड ही डिसेंबर महिन्‍याचा शेवटचा आठवडा ते जानेवारी महिन्‍याचा पहिला पंधरवाडा या दरम्‍यान करावी. एक एकर लागवडीपासुन आपणास आठ ते दहा एकर साठी लागणारे बियाणे आपणास मिळु शकते. खरिप हंगामातील सोयाबीन बियाणापेक्षा उन्‍हाळी  हंगामातील  सोयाबीन पासुन दर्जेदार  बियाणे  प्राप्‍त होऊ शकते. तसेच मार्गदर्शनात मा डॉ निता खांडेकर म्‍हणाल्‍या की, उन्‍हाळी हंगामातील सोयाबीन पिकांत किड-रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्‍यासाठी किड व रोग व्‍यवस्‍थापनाकडे लक्ष दयावे लागेल. शेतकरी बांधवांनी सोयाबीनच्‍या एकाच वाणाची लागवड करू नये. कमी कालावधीचा वाण असल्‍यास वर्षात दोन किंवा तिन्‍ही हंगामात सोयाबीन लागवड करणे शक्‍य आहे. खाण्‍याकरिता उपयुक्‍त असणारे सोयाबीन वाण सुध्‍दा विकसित झाले असुन त्‍याची सुध्‍दा लागवड शेतकरी करू शकतील. मार्गदर्शनात डॉ विरेंद्रसिंह भाटीया यांनी खरिप हंगामातील पावसाळी वातावरणातील आद्रतेमुळे सोयाबीन बियाणाच्‍या गुणवत्‍तेवर परिणाम होतो असे म्‍हणाले.  

कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाची आवश्‍यकता यावर डॉ सतिष निचळ, बीजोत्‍पादनासाठी वाणाची निवड यावर डॉ मिलिंद देशमुख, उन्‍हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर डॉ शिवाजी म्‍हेत्रे, उन्‍हाळी सोयाबीन पीकावरील किडींचे एकात्मित व्‍यवस्‍थापनावर डॉ राजेंद्र जाधव, उन्‍हाळी सोयाबीन रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ विक्रम घोळवे, उन्‍हाळी सोयाबीन काढणी, हाताळणी व साठवणुक यावर डॉ खिजर बेग आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ राजेंद्र जाधव यांनी केले. कार्यशाळेत उन्‍हाळी सोयाबीन बीजोत्‍पादनाविषयीचे प्रश्‍न व शंका यावर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ उत्‍तरे दिली. ऑनलाईन कार्यशाळेकरिता नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली इंजि. खेमचंद कापगाते, इंजि. रविकुमार कल्लोजी डॉ. अविनाश काकडे, डॉ. शिवराज शिंदे यांनी काम पाहिले. कार्यशाळेत राज्‍यभरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदविला, यात महाबीजमहाराष्‍ट्र राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणाकृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग, शेतकरी बीजोत्‍पादन कंपनीशेतकरी गटशेतकरी बांधव आदींनीही सहभाग घेतला. ऑनलाईन कार्यशाळेचे संपुर्ण प्रसारण विद्यापीठ युटयुब चॅनल youtube.com/user/vnmkv वर उपलब्‍ध  करण्‍यात आले आहे.