हिसार (हरियाणा) येथील केंद्रीय म्हैस संशोधन संस्थेतील जातीवंत मु-हा म्हशी व रेडे यांची खरेदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात हिसार (हरियाना) येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद - केंद्रीय म्हैस संशोधन संस्था येथुन जातीवंत मु-हा म्हशी व रेडे यांची खरेदी करण्यात आलेली असुन सदर पशुधनाचे प्रदर्शन दिनांक 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालन डॉ दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, शेतकरी बांधवाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने पशुधनास महत्व आहे, दुग्धव्यवसाय हा असा व्यवसाय आहे, यात शेणाचा वापर शेणखत म्हणुन वापर करण्यात येऊन पिक उत्पादनात वाढ होते तर दुध विक्रीही करता येते. अधिक दुध उत्पादनाकरिता शुध्द जातीवंत मु-हा जातीची म्हशी ही मराठवाडयाकरिता उपयुक्त आहे. परंतु मु-हा जातीच्या म्हैशीची अनुवंशीक शुध्दता जोपासने आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठातील पशुसंवर्धन विभागाने हिसार येथुन खरेदी केलेल्या म्हशीपासुन उत्पादीत होणारे शुध्द जातीच्या म्हशी मुळे दुध उत्पादनात वाढ होईल तसेच सदरिल शुध्द मु-हा रेडे वळु मर्यादित प्रमाणात शेतकरी बांधवाच्या म्हैशी भरविण्याकरिताही वापरता येऊ शकेल.
शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, शेतकरी उत्पन्न वाढीकरिता पशुधन व दुग्धव्यवसाय यांची शेती पुरक व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. विभागात विकसित केलेले शेळीपालन, कुक्कटपालन, दुग्धव्यवसाय, विविध दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विक्री उपक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थीना प्रत्यक्ष व्यवसाय कौशल्य शिक्षणाची संधी मिळेल तसेच विभागास भेट देण्या-या शेतकरी बांधव व महिला शेतकरी यांना माहितीसाठी उपयुक्त ठरेल.
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, मराठवाडयातील बदलत्या हवामानात मु-हा जातीच्या पशुधनावर होणार परिणामाचा अभ्यास विभागाच्या माध्यमातुन करण्यात यावा. विभागातील चांगल्या प्रतीच्या जातीवंत पशुधनाचा समावेश विविध ठिकाणी आयोजित पशु प्रदर्शनात घ्यावा, जेणे करून शेतकरी बांधवा जातीवंत पशुधनाची प्रत्यक्ष माहिती मिळेल.
प्रास्ताविकात डॉ गजेंद्र लोंढे म्हणाले की, हिसार येथुन आणलेल्या सहा म्हैशी पैकी दोन म्हैशीची वंशावळ हे या सरासरी पेक्षा जास्त दुध देणा-या आहेत. सदरिल जातीवंत म्हैशी व रेडे ही योग्य पध्दतीने पशुधन खरेदी समिती मार्फत निवड करून योग्य ती काळजी घेऊन आणण्यात आली आहेत.
सुत्रसंचालन डॉ दत्ता बैनवाड यांनी केले तर आभार डॉ रमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ शंकर नरवाडे, डॉ नरेंद्र कांबळे, डॉ संदेश देशमुख आदीसह विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.